Vasant More : नाराजी दूर झाली? वसंत मोरे मनसेत पुन्हा सक्रीय? राज ठाकरेंच्या पत्राबाबत म्हणाले…

मागील काही दिवसांपासून आपल्या भूमिकेमुळे वसंत मोरे पक्षात एकाकी पडले होते. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली होती. मात्र नुकतीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्यात आगामी निवडणुकीसाठीच्या मुलाखती घेताना ते दिसत आहेत.

Vasant More : नाराजी दूर झाली? वसंत मोरे मनसेत पुन्हा सक्रीय? राज ठाकरेंच्या पत्राबाबत म्हणाले...
वसंत मोरे (संपादित छायाचित्र)
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 05, 2022 | 11:20 AM

पुणे : बृजभूषण सिंह यांचा विषय आमच्यासाठी थांबला आहे. त्यावर राज ठाकरेच बोलतील, असे मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत. 5 जूनला राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. तर आज मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) अयोध्येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता मनसे नेते अयोध्येहून परत आल्यावर आम्ही दर्शन घ्यायला जाऊ. त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतले म्हटल्यावर आम्ही पण जाऊन दर्शन घेऊ, असे वसंत मोरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पत्र आले आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. घराघरात जाऊन पत्र देणार आहोत. तसेच त्यानुसार काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया मोरेंनी दिली आहे. त्यामुळे वसंत मोरेंची नाराजी दूर झाली का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय होता भोंग्यांचा मुद्दा?

मशिदीवरील भोंगे खाली उतरवले पाहिजेत, अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्याला वसंत मोरेंनी उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर त्यांचे शहराध्यक्षपदही गेले होते. कात्रज प्रभागामधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. या प्रभागातला मुस्लीम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठीशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मते आहेत. हीच मते गेमचेंजर ठरतात. त्यामुळे वसंत मोरेंची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी भोंग्यांच्या आंदोलनातून स्वत:ला बाजूला करत समंजसपणाची भूमिका घेतली होती.

एकत्र मुलाखती-वाद मिटला?

मागील काही दिवसांपासून आपल्या भूमिकेमुळे वसंत मोरे पक्षात एकाकी पडले होते. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली होती. मात्र नुकतीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्यात आगामी निवडणुकीसाठीच्या मुलाखती घेताना ते दिसत आहेत. तेही पक्षाच्या कार्यालयात आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबत. त्यातच राज ठाकरेंच्या पत्रानुसार काम करण्याचेही वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे सर्व वाद मिटला का, भोंग्यावरून वसंत मोरेंनी माघार घेतली का, प्रभागातील मुस्लीम नाराज होतील का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.