पुणे येरवडा कारागृहात चालले तरी काय? कैद्यांमध्ये पुन्हा का झाली हाणामारी?

Pune Cirme News : पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. येरवडा कारागृहात वारंवार कैद्यांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे येरवडा कारागृहात चालले तरी काय? कैद्यांमध्ये पुन्हा का झाली हाणामारी?
yerwada jail
| Updated on: Jun 25, 2023 | 10:12 AM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेला हा तिसरा प्रकार आहे. या प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील सर्वात जुने आणि मोठे कारागृह असलेल्या येरवडा जेलमधील सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे तुरुंग प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय झाले पुन्हा

राज्यातील सर्वात जुने कारागृह म्हणून पुणे शहरातील येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे. हे कारागृह नेहमी हाऊसफुल्ल असते. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. जन्मठेप किंवा इतर शिक्षेचे आरोपी कारागृहात आहे. खून प्रकरणात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या कारागृहात मोठी आहे. त्यानंतर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आहे. आता येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्यांमध्ये हाणामारी झाली आहे. जेलमध्ये कैद्यांकडून झालेल्या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जेलमधील चार कैद्यांविरोधात FIR

आठ दिवसांत येरवड्यात तिसऱ्यांदा कैद्यांमध्ये हाणामारी झाली आहे. काही दिवसांपूर्वी आळंदी येथील भांडण प्रकरणातील आरोपींमध्ये हाणामारी झाली होती. ही हाणामारी प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे यांचा वापर करुन झाली होती. यावेळी काही जण जखमी झाले होते. त्यानंतर पुणे येथील गालफाडे टोळीतील कैद्यांनी हाणामारी केली होती. यावेळी 16 कैदी आपापसात भिडले होते. ही हाणामारी पूर्ववैमनस्यातून झाली होती. यावेळी दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहात वाढत जाणाऱ्या हाणामारीच्या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा धोक्यात आली आहे. नुकतेच कारागृहातील कैद्यांसाठी नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. कैद्यांना महिन्यातून तीन वेळा नातेवाईकांशी संपर्क करता येणार आहे. त्यासाठी त्यांना फोनची सुविधा दिली आहे.