सत्तासुंदरी हातातून गेल्याने भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी; राजू शेट्टींचा शेलारांवर पलटवार

राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. (raju shetti criticized ashish shelar over farm laws)

सत्तासुंदरी हातातून गेल्याने भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी; राजू शेट्टींचा शेलारांवर पलटवार
| Updated on: Dec 24, 2020 | 5:19 PM

इचलकरंजी: राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. (raju shetti criticized ashish shelar over farm laws)

राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आशिष शेलार यांच्या हातून सत्तासुंदरी गेली आहे. त्यामुळे शेलारसह त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे. भाजप नेत्यांना ध्यानीमनी नुसती सत्ताच दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.

शेलार ‘पिंजरा’मधील मास्तर

आशिष शेलार यांची स्वत:ची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरांसारखी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी शरद पवारांचे पाय चाटण्यासाठी कोण गेले होते? असा सवाल शेट्टी यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहोत, ते अदानी-अंबानीसाठी लढा देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले होते शेलार?

काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. त्यात एक शिक्षक मोहापायी वाहवत जातो. शेवटी त्याला हाती तुणतुणे हाती धरण्याची वेळ येते. आताही तेच चित्रं दिसत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या एका नेत्याला एका विधानपरिषदेसाटी हाती तुणतुणे धरण्याची वेळ आली आहे. फडावर जसं तुणतुणं हाती घ्यावी लागतं तसंच एक दलाला विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीची बाजू घेऊन तुणतुणे वाजवत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आजपासून किसान आत्मनिर्भर यात्रेस सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत शेलार यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. अंबांनी आणि अदानीमुळे तर शेतकऱ्यांच्या हक्कांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. अंबानी, अदानींनी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावला तर त्यांच्यासाठी मी मुंबईत काठी घेऊन बसलो आहेच, असंही ते म्हणाले होते. (raju shetti criticized ashish shelar over farm laws)

 

संबंधित बातम्या:

राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ, शेलारांचा जहरी वार

इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे, सदाभाऊंचा पवारांवर हल्लाबोल

बोंडेंनी विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत; राजू शेट्टींचा सल्ला

(raju shetti criticized ashish shelar over farm laws)