गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी दरम्यान पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत.

गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर एआय ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी
| Updated on: Jun 16, 2025 | 7:22 AM

राज्यभरातील वारेकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे १९ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी या भक्तीपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत.

पुणे पोलिसांकडून एआयची व्यवस्था विश्रांतवाडी, संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट या प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

बस मार्गात होणार बदल

श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २० आणि २१ जून रोजी पुण्यात मुक्कामासाठी आहे. २२ जून रोजी पहाटे हडपसरमार्गे सासवडला आणि लोणी काळभोरला मुक्कामी पोहचेल. त्यामुळे या मार्गावरील बस मार्गात बदल केला आहे. पुण्यातून सासवडला पालखी सोहळा जाताना प्रवासी, भाविकांसाठी ६० जादा बसेचे नियोजन केले आहे. २२ जून रोजी दोन्ही पालख्या दुपारी १२ ते १ दरम्यान हडपसर येथे थांबतात. त्यामुळे महात्मा गांधी स्थानकातून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बस व्यवस्था केली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बस उपलब्ध होईल.

बोपदेव घाटमार्गे बस सुरू असणार

श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा हडपसरमार्गे दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी जातो. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक असतात. त्यामुळे दिवेघाट रस्ता वाहतुकीस पूर्णतः बंद असतो. या मार्गावरील बस वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असेल. बस दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे सुरू राहील. बस स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर अशा असणार आहे. त्यासाठी ६० जादा बसचे नियोजन केले आहे.

आषाढीसाठी ८० विशेष रेल्वे

आषाढी वारीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगाव येथून ८० आषाढी विशेष रेल्वे धावणार आहेत.

पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्याच्या १६ फेऱ्या होणार आहे. ट्रेन क्रमांक ०१२०७ ही गाडी ३ ते १० जुलैपर्यंत पुणे येथून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी सायंकाळी पावणेसात वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१२०८ ही विशेष गाडी मिरज ते पुणे धावणार यामध्ये पंढरपूरला थांबा असणार. रेल्वेत १२ सामान्य द्वितीय श्रेणी/शयनयान श्रेणीचे कोच असेल. तसेच, नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर यांच्या प्रत्येकी चार फेऱ्या असणार, लातूर-पंढरपूर (१० फेऱ्या), मिरज-कलबुर्गी (२० फेऱ्या) आणि कोल्हापूर-कुर्दुवाडी (२० फेऱ्या) अशा गाड्या धावणार आहे.