Pune News : पुणे शहरातील विद्यार्थ्यांनी बनवला आगीवर नियंत्रण करणारा रोबो, नरेंद्र मोदी यांनी केले कौतूक

Pune News : पुणे शहरातील विद्यार्थ्यांनी एक रोबो तयार केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या रोबोचे पेटंट घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचे कौतूक केले आहे.

Pune News : पुणे शहरातील विद्यार्थ्यांनी बनवला आगीवर नियंत्रण करणारा रोबो, नरेंद्र मोदी यांनी केले कौतूक
Pune Student Robo
| Updated on: Aug 05, 2023 | 2:34 PM

पुणे | 5 ऑगस्ट 2023 : आग लावण्याच्या घटना घडल्यावर अग्नीशमन दलाच्या जवानांची धावपळ बघायला मिळते. अनेक वेळा लहान रस्ते, उंच बिल्डीग किंवा इतर अडचणीमुळे अग्नीशमन दलातील कर्मचाऱ्यांना पोहचण्यासाठी अनेक अडचणी येतात. हा सर्व विचार करुन पुणे शहरातील विद्यार्थ्यांनी रोबोचा पर्याय तयार केला आहे. विद्यार्थ्यांच्या या रोबाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे. पुणे शहरातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केला आहे.

एलिफायर रोबोची निर्मिती

ज्ञानप्रबोधनी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नवीन्यपूर्ण रोबोची निर्मिती केली आहे. त्या रोबोला एलिफायर हे नाव दिले आहे. अर्णव वडीकर, राज जैन, मिथिलेश हिंगमिरे. श्लोक दळवी, यश कापसे या विद्यार्थ्यांनी एलिफायर रोबो तयार केला आहे. या उपक्रमासाठी त्यांना शिक्षिका डॉ. श्रद्धा केळकर, प्रणव पुजारी, प्रथमेश वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

किती आला खर्च

पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या होत्या. यासंदर्भातील बातम्या वाचून विद्यार्थ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवणे किती जोखीमचे असते अन् अग्नीशमन दलाचे कर्मचारी ही कामगिरी कशी पार पाडता? हा विचार सुरु केला. मग त्यासाठी रोबो तयार करण्याची कल्पना त्यांना आली. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले अन् एलिफायर म्हणजेच हत्तीच्या सोंडेसारखा हा अग्निशामक रोबो तयार झाला. या रोबोचा पाईप कोणत्याही बाजूला फिरवता येतो. यामुळे आग लागलेले ठिकाण चारीही बाजूने पाईप फिरवून आगीवर नियंत्रण मिळवता येतो. त्याला रिमोटद्वारे नियंत्रण केले जाऊ शकते. या रोबोसाठी जवळपास ३५ हजार खर्च आला.

मिळाले पहिले पारितोषिक

विद्यार्थ्यांसमोर एअरोनॉटिक्स, बायो मिमिक्री आणि ग्रामविकास हे तीन विषय होते. त्यात ज्ञानप्रबोधनिच्या या विद्यार्थ्यांनी बायो मिमिक्री विषय घेऊन रोबो तयार केला. या रोबोला हत्तीच्या सोडेंचे प्रारुप आहे. या प्रकल्पाला विभागातील पहिले पारितोषिक मिळाले. जी-२० अंतर्गत झालेल्या प्रदर्शनात ‘एलिफायर’चे सादरीकरण झाले. दिल्लीत झालेल्या प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पाचे मोदी यांनी कौतूक केले.

पेटंट घेण्याचा प्रयत्न

ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या रोबोचे पेटंट घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्ञानप्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक यांनी ही माहिती दिली. तसेच त्याची व्यापक प्रमाणात निर्मिती झाल्यास उत्पादन खर्चही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.