Vidyanand Bapat Song: फाडफाड मराठी बोलणाऱ्या बापटांवर कडक मराठी गाणं, अवधूत गुप्तेचा नवा स्वॅग पाहा
Vidyanand Bapat Song: सध्या सोशल मीडियावर एक गाणे तुफान व्हायरल होत आहे. हे गाणे विद्यानंद बापट यांच्यावर तयार करण्यात आले आहे. हे गाणे अवधूत गुप्ते यांनी शेअर केले आहे. तुम्ही पाहिले का?

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात ठाम भूमिका घेत विद्यानंद बापट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. त्यांच्या स्वच्छ आणि सरळ मराठी भाषेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर सध्या विद्यानंद बापट यांचाच बोलबाला सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी त्यांच्यासाठी खास गाणे तयार केले आहे. हे गाणे सध्या चांगलेच चर्चेत आहे.
काय आहे गाणे?
डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना पाठिंबा देत अवधूत गुप्ते यांनी एक खास गाणे रेकॉर्ड केले आहे. गाण्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. “तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा” अशा ओळींनी हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायन अवधूत गुप्ते यांनीच केले आहे. विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला कलाकाराकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
काय आहेत गाण्याचे बोल?
अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “स्वच्छ विचार अन् स्वच्छ वाणीवर हसणाऱ्या माकडांचा मंगला असला, पवित्र असला तरीही देश हा दगडांचा… तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा, विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा” असे कॅप्शन दिले आहे. हे गाणे चर्चेचा विषय ठरला आहे.
अवधूत गुप्ते हे हटके आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत गाण्यातून मांडण्याची त्यांची खासियत आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’ सारख्या चित्रपटांमधून आणि अनेक राजकीय पक्षांच्या गीतांमधून त्यांनी ज्वलंत मुद्दे प्रेक्षकांसमोर आणले आहेत. कलाकार म्हणून असलेली सामाजिक जाणीव नेहमीच त्यांच्या गाण्यातून स्पष्ट दिसते.