पर्यटकांसाठी खुशखबर, शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वी सिंहगड किल्ला पुन्हा खुला, आता भटकंतीचा आनंद वाढणार कारण…

sinhagad fort: सिंहगड किल्ल्यावरील बेकायदा बांधकामांवर कारवाई पूर्ण झाली आहे. सुमारे २० हजार चौरस फूट बेकायदा बांधकामे हटविले गेले आहे. त्यानंतर शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वी किल्ला पर्यटनासाठी सुरु केला आहे.

पर्यटकांसाठी खुशखबर, शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वी सिंहगड किल्ला पुन्हा खुला, आता भटकंतीचा आनंद वाढणार कारण...
sinhagad fort
| Updated on: Jun 05, 2025 | 8:00 AM

शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वी शिवप्रेमींना चांगली बातमी मिळाली आहे. पुणे येथील सिंहगड किल्ला ५ जून पासून पुन्हा सुरु करण्यात आला आहे. सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण कारवाईचे काम संपल्याने आजपासून पर्यटनासाठी किल्ल्या खुला करण्यात आला आहे. २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती. या काळात अतिक्रमणविरोधी कारवाईसह धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई २९ मे पासून सुरू करण्यात आली. तसेच पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. अतिक्रमण व दरडी हटविण्याच्या कामासाठी रस्ता मोकळा असावा यादृष्टीने पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेवून सिंहगड किल्ल्यावर जाण्यास बंदी होती.

२० हजार चौरस फूट बेकायदा बांधकामे हटविली

वन विभागाने मंगळवार (दि. ३) गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. सुमारे २० हजार चौरस फूट बेकायदा बांधकामे हटविले आहे. याबाबत हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी सांगितले की, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच कारवाईत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी किल्ल्यावर प्रवेश बंद करण्यात आला होता. आता सर्व काम पूर्ण झाले असल्याने तसेच राडारोडा उचलण्याचे काम बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केल्याने किल्ल्यावर प्रवेश सुरू करण्यात आला आहे. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. या दिवशी शिवप्रेमींना गडावर येता यावे, यादृष्टीने नियोजन करुन कामे पूर्ण करण्यात आली आहे. सिंहगडाचे ऐतिहासिक पावित्र्य राखण्यासाठी तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गडावर भविष्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे प्रांताधिकारी माने यांनी सर्व विभागांना आदेश दिले आहेत

राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. सर्व अतिक्रमण ३१ मेपूर्वी काढण्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरु केली. सिंहगड गडाच्या इतिहासात प्रथमच बेकायदा बांधकामावर धडक कारवाई करून गड अतिक्रमणमुक्त केले आहे.