
पुणे शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे सध्या राजकारण तापले आहे. त्यापाठोपाठ कल्याणमध्येही प्रसूतीगृहात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. ही दोन प्रकरणं ताजी असतानाचा आता रायगडमध्येही अशाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात एका बाळंतिणीचा हृदयविकाराच्या रुग्णवाहिकेअभावी (कार्डियाक रुग्णवाहिका) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळवटी येथील एका महिलेला श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर अचानक त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी तिला तातडीने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील कार्डियाक रुग्णवाहिका बंद असल्याने प्रशासनाने तिला साध्या रुग्णवाहिकेतून अलिबागला पाठवले. अलिबाग येथे पोहोचल्यानंतर महिलेची प्राणज्योत मालवली.
मृत महिलेचे पती झाकीर वाळवटकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “सिझेरियननंतर माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली. तिला त्वरित अलिबागच्या शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करणे गरजेचे होते. पण कार्डियाक रुग्णवाहिका खराब असल्याने दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली. पण जर वेळेत कार्डियाक रुग्णवाहिका मिळाली असती, तर कदाचित माझी पत्नी वाचली असती.” असा आरोप झाकीर वाळवटकर यांनी केला.
या घटनेवर श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील मNRHM) डॉ. मधुकर ढवळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रुग्णालयात महिलेवर व्यवस्थित उपचार करण्यात आले. अचानक तिची तब्येत खालावली. यामुळे तिला अलिबाग येथे हलवण्याचा निर्णय घेतला. कार्डियाक रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने दुसरी रुग्णवाहिका तातडीने मागवण्यात आली. साध्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन आणि डॉक्टरही देण्यात आले होते. मात्र, अलिबागला पोहोचल्यावर तिची तब्येत आणखी बिघडली. तिचा मृत्यू झाला. आमच्याकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही.” असे डॉ. मधुकर ढवळे म्हणाल्या.
या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची पोलखोल झाली आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे पुन्हा एका महिलेचा जीव गेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.