धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती करा, लसीकरण वाढवा; पालकमंत्री भुजबळांचे आदेश

| Updated on: Oct 24, 2021 | 3:31 PM

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती करा. दिवाळीच्या तोंडावर लसीकरण वाढवा, असे आदेश राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती करा, लसीकरण वाढवा; पालकमंत्री भुजबळांचे आदेश
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.
Follow us on

नाशिकः सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती करा. दिवाळीच्या तोंडावर लसीकरण वाढवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

येवला विश्रामगृह येथे निफाड आणि येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीची आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी घेतली. याबैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस शैलजा कृपास्वामी, मनमाड महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, येवला महावितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता आर. एम. पाटील, येवला नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका कृषी अधिकारी ए. एस. आढाव, बी.जी. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, डॉ. हर्षल नेहेते, येवला गट विकास अधिकारी डॉ. उमेष देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. पुरी, जे. डी. हगवणे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मालेगावच्या धर्तीवर धर्मगुरू यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. रुग्णसंख्या कमी करण्याकरीता त्रिसूत्रीच्या वापरासोबतच लसीकरण महत्त्वाचे आहे. शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

तालुक्यात सुरू करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीसोबत समन्वय साधून प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियोजन करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे वेळेत पूर्ण करा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यात यावा, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी अतिवृष्टीबाधित परिस्थितीचा आढावा घेताना सांगितले. यासोबतच वीज वितरण कंपनीच्या वीज देयकांच्या थकबाकी व वसुलीबाबत देखील माहिती घेतली.

इतर बातम्याः

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा…नाशिकमध्ये मौसम सुहाना; मंतरलेल्या चोरपावलानं थंडीचं आगमन!

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास