
आज बहुचर्चित उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा झाली. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून या युतीची चर्चा सुरु होती. राज आणि उद्धव दोन्ही ठाकरे बंधुंचं परस्परांच्या घरी जाणं-येणं वाढलं होतं. अखेर आज अधिकृत या युतीवर शिक्कामोर्तब झालं. वरळीच्या ब्लू सी हॉटेलमधून राज ठाकरे यांनी युती झाल्याचं मी घोषित करतो असं जाहीर केलं. आजच्या या पत्रकार परिषदेला ठाकरे कुटुंबातील सर्व महत्वाचे सदस्य उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठकारे, पुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्याशिवाय राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, बहिण, मुलगा अमित ठाकरे उपस्थित होते. दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हजर होते.
आजच्या या पत्रकार परिषदकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण ठाकरे बंधुंनी एकत्र यावं हे अनेक वर्षांपासून मत व्यक्त होत होतं. अनेकांची तशी इच्छा होती. अखेर आज ती इच्छा पूर्ण झाली. मुंबईसह ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगर पालिकांमध्ये ठाकरे बंधु युतीमध्ये एकत्र निवडणूक लढवणार आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एकावाक्याने सर्वांना जिंकून घेतलं. राज ठाकरे हे हजर जबाबीपणासाठी ओळखले जातात. आज पत्रकार परिषदेत पुन्हा त्याची चुणूक दिसून आली. राज ठाकरे यांनी असं उत्तर दिलं की, टीका करणाऱ्याची बोलती बंद झाली पाहिजे.
प्रतिक्रिया सर्वकाही बोलून गेली
भाजप नेते रावसाहेब दानवे टीका करताना म्हणालेले की, या महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. त्यावर उद्धव ठाकरे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. उद्धव यांनी उत्तर देण्याचं टाळलं. मला उत्तर देणं योग्य वाटत नाही असं उद्धव बोलले. त्यावर शेजारी बसलेल्या राज ठाकरे यांनी गमतीने बोलती बंद होईल असा टोला हाणला. ‘उत्तर देवांना द्यावीत दानवाना नाही’, त्यावर उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. कारण रावसाहेबांच्या आडनावात दानवे आहे. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया सर्वकाही बोलून गेली.