अजित गेल्यानंतर पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी… ; राजेंद्र पवार यांची भावुक पोस्ट, सांगितली जुनी आठवण
राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी भावुक पोस्ट केली. त्यांनी यावेळी दिवाळीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यंदा अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाहीत. त्यामुळे यंदा पवार कुटुंबीय एकत्र येणार नाही. त्यात दुष्काळ असल्याने रोहित पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी अजितदादांसाठी एक खास पोस्ट लिहित जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजित गेल्यानंतर पहिल्यादांच दिवाळी सुनी सुनी वाटत असल्याच्या भावना राजेंद्र पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केल्या. या पोस्टमधून त्यांनी अजित पवार आणि बारामतीच्या जुन्या आठवणी सांगितल्या. यावर पोस्टनंतर टीव्ही9 मराठीशी बोलताना राजेंद्र पवार यांनी महत्वाचं भाष्य केलं.
राजेंद्र पवार म्हणाले, ‘यावर्षी अजितदादा यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाही. खरंतर पोस्टमध्ये जे काही व्यक्त व्हायचं आहे, ते झालं आहे. तीन वर्षांपूर्वी रोहित पवार यांनी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा दौरा केला होता. त्यावेळेस दुष्काळ नव्हता. परंतु त्यांनी ती दिवाळी आदिवासींसोबत आम्ही संपूर्ण कुटुंबाने साजरी केली. इथे थांबण्यापेक्षा भयानक असा दुष्काळ पडला आहे. त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी शब्दाने दुष्काळ हटणार नाही, परंतु त्या लोकांना आधार देणे गरजेचे आहे. अजित दादा सोबतच्या असंख्य आठवणी आहेत. दिवाळी आली की वेगळ्या आठवणी असतात. शिक्षणाच्या बाबतीत वेगळ्या आठवणी असतात. राजकीय बाबतीत वेगळ्या आठवणी असतात’.
‘आमच्या आजींचा एक शिरस्ता होता. व्यवसायाच्या निमित्ताने माझे दोन काका पुण्यामध्ये होते. अजित दादांचे वडील इथे असायचे. असं जरी असलं तरी सुख दुःख असेल कुठलेही सण समारंभ असेल त्यावेळी एकत्र येणे हा आमच्या आजींचा शिरस्ता होता. त्यामुळे आम्ही दिवाळीला एकत्र येत होतो. विलीनीकरणाच्या चर्चा काल परवा पवार साहेब आजारी असताना हॉस्पिटलमध्ये चालल्या. रोहित पवार हे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फिरत आहेत. आम्ही इथ बारामतीमध्ये आहोत. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा काय चालल्या, हे माहिती नाही. जरी त्या चालल्या असतील, तरी जे नेते मंडळी आहेत. पक्षाचे प्रमुख आहेत, ते याबाबत निर्णय घेतील, असे राजेंद्र पवार कुटुंबीयांनी सांगितलं.
‘रोहित पवार दुष्काळ दौरा जे करत आहेत, ते चांगलं काम करत आहेत. त्यांनी लोकांसाठी काम करण्याचं निवड केली आहे, ती योग्य आहे. त्यांचं कामच आहे लोकांच्या अडचणी समजून घेणे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे. उद्या सत्तेत आल्यानंतर अडचणी काय असतात, हे जर त्यांना समजल्या, तर नक्कीच ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची व्यवस्था करतील, असे त्यांनी पुढे सांगितले.