Blinkit च्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर?, ऑनलाईन फूड डिलिव्हरी सुरक्षेला छेद, video viral
ऑनलाईन फूड मागवण्याचे चलन अलिकडे प्रचंड वाढले आहे. मात्र हे अन्नपदार्थ पाठवताना कंपन्या नीट काळजी घेत नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. अशाच एका घटनेत ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी म्हणजे निर्धोक अशा समजाला तडा देणारी घटना उघडकीस आली आहे. कल्याण खडकपाडा येथील गोदरेज हिल परिसरातील ऑनलाईन डिलीव्हरी करणाऱ्या Blinkit कंपनीच्या गोदामात आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. यामुळे फुड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांच्या डोळ्या मागे आपल्या गोदामात किती स्वच्छता ठेवतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आता उंदराच्या या व्हिडीओमुळे अन्न आणि औषध प्रशासन अशा कंपन्यावर कारवाई करणार का असा सवाल केला जात आहे.
कल्याण खडकपाडा येथील Blinkit कंपनीच्या गोदामात आईस्क्रीमच्या क्रेटमध्ये उंदीर असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ आईस्क्रीम ठेवलेल्या क्रेटमध्ये चक्क उंदीर आरामात बसल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
झेप्टोवर झाली होती कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाने झेप्टोच्या पुणे तसेच नाशिक येथील गोदामावर कारवाई केली होती. या गोदामात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली होती.या गोदामाचा परवाना देखील एफडीएने निलंबित केला होता. नाशिक येथील सिडको परिसरातील झेप्टो गोदामात अस्वच्छता आढल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच पुणे येथील गोदामावर देखील कारवाई करण्यात आली आहे.