
राज्यातील राजकारणात सध्या विविध घडामोडी सुरु आहेत. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेने ८ जागांवर विजय मिळवत बाजी मारली आहे.
महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार चिपळूण पंचायत समितीचे सभापती पद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले असून, उर्वरित सर्व ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. या निवडणुकीपूर्वी संगमेश्वर आणि चिपळूण या दोन जागांवरून महायुतीमध्ये (शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी) काही प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप केला. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर संगमेश्वरचे पद शिवसेनेकडे तर चिपळूण राष्ट्रवादीकडे ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडून आलेले हे सर्व पदाधिकारी आगामी सव्वा वर्षांच्या (१५ महिने) कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहतील.
| पंचायत समिती | सभापती | उपसभापती | पक्ष |
| मंडणगड | प्रणाली संदेश चिले | दिपक शंकर मालुसरे | शिवसेना (शिंदे) |
| खेड | आफिया नजीब पालेकर | सुनिल बाबाराम मोरे | शिवसेना (शिंदे) |
| दापोली | उन्मेष रामचंद्र राजे | नम्रता प्रदिप तोडणकर | शिवसेना (शिंदे) |
| चिपळूण | संदेश मनोहर आयरे | – | राष्ट्रवादी (अजित पवार) |
| गुहागर | प्रणव प्रमोद पोळेकर | – | शिवसेना (शिंदे) |
| देवरुख | शर्वरी प्रथमेश वेल्ये | – | शिवसेना (शिंदे) |
| रत्नागिरी | प्रविण धोंडू पांचाळ | गजानन धर्माजी धनावडे | शिवसेना (शिंदे) |
| राजापूर | नंदिनी नितिन कदम | अभिजित यशवंत गुरव | शिवसेना (शिंदे) |
| लांजा | मानसी सिध्देश्वर आंबेकर | आदेश दत्तात्रय आंबोळकर | शिवसेना (शिंदे) |
अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर पंचायत समित्यांवरही कब्जा मिळवून शिवसेनेने कोकणातील आपला गड मजबूत केला आहे. लांजा, राजापूर, देवरुख, खेड आणि मंडणगड या पाच महत्त्वाच्या तालुक्यांत महिलांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. ही संधी देऊन शिवसेनेने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे. खेडमध्ये सौ. आफिया पालेकर यांची निवड करून पक्षाने सर्वसमावेशकतेवर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.