Ravindra Dhangekar : पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार, आधी झटका दिला नंतर रवींद्र धंगेकर म्हणाले, पक्ष सोडताना…

रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर हे वृत्त खरं होताना दिसतंय.

Ravindra Dhangekar : पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार, आधी झटका दिला नंतर रवींद्र धंगेकर म्हणाले, पक्ष सोडताना...
रविंद्र धंगेकर
Image Credit source: social media
| Updated on: Mar 10, 2025 | 11:52 AM

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर हे वृत्त खरं होताना दिसतंय. धंगेकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटाच प्रवेश करणार असून काँग्रेस सोडताना दुःख होतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी दिली आहे. धंगेकर हे पक्षाला रामराम करून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. गेल्या वर्षी धंगेकरांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर अंतर्गत गटबाजीची चर्चा काँग्रेसच्या गोटात फिरत होती. या सर्व पार्श्वभूमीवर धंगेकर आता काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनीही धंगेकरांची भेट घेतली होती. त्यांना खुली ऑफर देण्यात आल्याचेही वृत्त होते. मात्र योग्य वेळ आली की आपण बोलू असे स्पष्टीकरण धंगेकर यांनी दिले होते. अखेर आता ती वेळ आल्याचे दिसत असून धंगेकरांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय फायनल झाल्याचे वृत्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं असून काँग्रेस सोडताना दुःख होतं आहे, असे ते म्हणाल्याचे समजते. एकनाथ शिंदेंनी मला मदत केली, असेही ते म्हणाले. आज संध्याकाळी 7 वाजता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले धंगेकर ?

पक्ष सोडण्याच्या पार्श्नभूमीवर धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.’ सगळ्या कार्यकर्त्यांशी माझी बैठक, चर्चा झाली. मी मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घेणं हे प्रचंड कठीण असतं. या पक्षासोबत मी गेली 10-12 वर्ष काम करतोय. पक्षातील सर्वांशी कौटुंबिक नाती निर्माण होत असतात. 8-10 वर्षांत आपण एकमेकांचे सहकारी होतो, कुटुंबातले होतो. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. लोकसभा असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरपर्यंत, सर्वांनीच माझ्यामागे प्रचंड ताकद उभी केली. निवडणूक यंत्रणेत सर्वांनीच भाग घेतला. मी निवडणूक हरलो, हा वेगळा विषय पण सर्वांनीच कष्ट केले, त्यांची जी ताकद माझ्या पाठिशी उभी केली’, असं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं.

‘पक्ष सोडताना खूप दुःख होतंय, मीही माणूसच आहे. मतदारांशीही मी चर्चा केली, आमच्याकडे काम कोण करणार, असा सर्वांचा सवाल होता. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही’, असंही धंगेकर म्हणाले. मागच्या काही दिवसांत मी दोन-तीन वेळा एकनाथ शिंदे यांची कामानिमित्त भेट घेतली होती, उदय सामंत यांचीही भेट झाली. एकदा तुम्ही आमच्या सोबत काम करा, असं ते मला वारंवार सांगत होते. कामं तर करायची आहे, पण सत्तेशिवाय कामं होत नाहीत. अखेर सर्वांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला, शिंदे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं आहे. मी एकनाथ शिंदेंकडे काहीही मागितलेलं नाही. आज संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि फायनल निर्णय घेऊ असे धंगेकरांनी नमूद केलं.