सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार..

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, यादरम्यान बारातमीमध्ये घडामोडींना वेग येत आहे. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांची कोणतीही चर्चा झाली नाही.

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार..
Supriya Sule
| Updated on: Jan 31, 2026 | 10:44 AM

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ 8.45 ला त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचे निधन झाले, विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. अजित पवार यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त 4 सभा होत्या आणि याच सभांसाठी ते बारामतीत येत होते. कार्यकर्त्ये गेटवर अजित पवार यांच्या स्वागतासाठी वाट पाहत होते आणि त्यांच्या निधनाची बातमी आली. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी आहेत, त्यानंतर थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे निधन झाल्याचे कळताच मोठी खळबळ उडाली. यादरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली. विमान आकाशात एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसत होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उपमुख्यमंत्री पवार कुटुंबियांपैकी नक्की कोण होणार? यावरून चर्चा रंगत असतानाच स्पष्ट झाले की, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार मुंबईत आल्या.

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही किंवा शपथ घेणार आहेत की नाही हे देखील माहिती नाही. यादरम्यानच शरद पवार यांनी हे देखील स्पष्ट केले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते आणि त्याबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार आणि माझी इच्छा होती की, राष्ट्रवादी एकत्र यावी.

सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर बारामतीमध्ये घडामोडींना वेग येत आहेत. शरद पवार यांना भेटण्यासाठी संदीप क्षीरसागर, रोहित पवार दाखल झाले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत. संदीप क्षीरसागर यांनी यादरम्यान माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. शरद पवार यांच्या भेटीला काही नेते पोहोचल्याचे सांगितले जात आहे.