पक्षात एकटे पडले का? अखेर रोहित पवारांनी सांगितली आतली गोष्ट, थेट त्या पत्राचा दाखला अन् म्हणाले…
राजकीय वर्तळातून मोठी बातमी समोर येत आहे. आमदार रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. मात्र या त्यांच्या आंदोलनाला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा नसल्याची चर्चा सुरू आहे, याबाबत बोलताना त्यांनी आता मोठा खुलासा केला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आमदार रोहित पवार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. मात्र या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा नसल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोतलाना त्यांनी मोर्चा संदर्भात मोठा दावा केला आहे. शेतकरी आणि सेतमजुरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, यामध्ये राजकारण येऊ नये अशी आमची भूमिका आहे. शशिकांत शिंदे हे स्वत: अख्ख्या महाराष्ट्रात स्वत: फिरले आहेत. सुप्रिया सुळे या देखील महाराष्ट्रात फिरल्या आहेत. शरद पवारांनी देखील स्वत: सगळा आढावा घेतला आहे. या सर्वांनी आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिले आहे, तेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आणि आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. विदर्भात हे जे अधिवेशन होत आहे, पुढच्या तीन वर्षांमध्ये परत विदर्भात अधिवेशन होणार नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे तेथील विधानभवन हे रिनोव्हेशनला काढण्यात आलं आहे. आज सर्वच ठिकाणी दुष्काळ आहे, पण विदर्भाचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचं आहे, आणि ते होणारच. या आंदोलनात शशिकांत शिंदे यांच्यापासून सगळे मोठे नेते, शेतकऱ्यांना शेतमजुरांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनात सहभागी होतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
पवारसाहेबांनी आम्हाला नेहमी नेहमी सांगितलं आहे, की जिथे कुठे महाराष्ट्रातील एखादा माणूस अडचणीत येतो, तिथे भूमिका न पहाता त्या व्यक्तीच्या मागे उभं राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी आंदोलनं केली, काही ठिकाणी आम्ही पक्षाचं चिन्ह वापरलं काही ठिकाणी वापरलं नाही. मात्र नेहमीच सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका राहिली आहे. त्यामुळे या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा मिळणारच असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.