22 शतकं ठोकूनही भारताकडून संधी मिळाली नाही, UAE गाठलं; आता इंडिया ए विरुद्ध शतक ठोकून पठ्ठ्यानं दाखवला दम!
Harpreet Bhatia Cricket Journey: युएईचा सलामीवीर हरप्रीत सिंग भाटियाने रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये इंडिया 'अ' संघाविरुद्ध गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. हरप्रीतने 120 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.

युएईचा फलंदाज हरप्रीत सिंग भाटियाने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या 11 व्या सामन्यात एक उल्लेखनीय शतक झळकावले. या डावखुऱ्या फलंदाजाने इंडिया ‘अ’ संघाच्या गोलंदाजीवर 120 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हरप्रीतने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. हरप्रीत सिंगचे हे शतक खूप खास आहे. कारण त्याने हे शतक आपल्या जन्मभूमीविरुद्ध केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत सिंग छत्तीसगडचा रहिवासी आहे. त्याने तेथे बराच काळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले, पण त्यानंतर त्याने भारत सोडून युएईसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आता हरप्रीतने युएईसाठी पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. हरप्रीत सिंग भाटिया 2010 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला. या संघात केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि हर्षल पटेल यांसारख्या खेळाडूंचाही समावेश होता.
त्या स्पर्धेत हरप्रीतने तीन डावांमध्ये 23.33 च्या सरासरीने 70 धावा केल्या. हरप्रीतने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी एकूण 86 प्रथम-श्रेणी सामने खेळले आहे. त्यात 45.40 च्या सरासरीने 5403 धावा केल्या आहेत. या खेळाडूने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये 16 शतके झळकावली आहेत. लिस्ट ए मध्ये त्याने भारतासाठी सहा शतके केली आहे. आता त्याने आणखी एका शतकाची भर घातली आहे.
हरप्रीत सिंग पंजाब किंग्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि केकेआर या तीन आयपीएल संघांकडूनही खेळला आहे. हरप्रीत केकेआरकडून फक्त एक सामना खेळला, ज्यात त्याने फलंदाजी केली नाही. तो पुणे वॉरियर्स इंडियाकडून तीन आणि पंजाब किंग्सकडून पाच सामने खेळला. नऊ आयपीएल सामन्यांमध्ये हरप्रीतने 17.57 च्या सरासरीने 123 धावा केल्या आहेत.
मंगळवार 24 नोव्हेंबर रोजी आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या 11 व्या सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ आणि युएई संघ मैदानात उतरले आहेत. दोहा येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात, युएईने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 गडी गमावून 249 धावा केल्या. भारतीय संघासमोर विजयासाठी 250 धावांचे लक्ष्य आहे. युएईकडून हरप्रीत सिंग भाटियाने 130 धावा करत शतक झळकावले, ज्यात 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या काळात अर्शद खानने भारतीय संघासाठी सर्वाधिक 4 बळी घेतले.
