धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर सिनेस्टाईल दरोडा; कुरीअर कंपनीची ३ कोटी ६ लाखांची रोकड लंपास!

धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेरजवळ मध्यरात्री दरोडेखोरांनी कुरियर कंपनीच्या कारवर सिनेस्टाईल हल्ला केला. यावेळी दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी सोडत कारमधील रोकड हिसकावून दरोडेखोरांनी पलायन केले आहे.

धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर सिनेस्टाईल दरोडा; कुरीअर कंपनीची ३ कोटी ६ लाखांची रोकड लंपास!
robbery in Mumbai-Agra highway
| Updated on: Nov 02, 2026 | 9:30 PM

मनेष मसोळे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ कुरीयर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कार अडवून पाच ते सहा दरोडेखोरांनी लोखंडी पाईप आणि काठ्यांनी हल्ला केला. दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांचे अपहरण करण्यात आले आणि काही अंतरावर निर्जनस्थळी त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर कारमधील कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना केली आहेत.

Loading...

सुरत येथील पी. उमेशचंद्र अँड सन्स एलएलपी या कुरीयर कंपनीचे कर्मचारी सुनील शिवरामभाई पटेल आणि शैलेश पटेल हे भोपाळ शाखेतून जमा झालेली ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड घेऊन क्रेटा कारने मुंबईच्या दिशेने जात होते. मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पळासनेरजवळ पुलाचे काम सुरू असल्याने ते सर्व्हिस रोडने प्रवास करत होते. याचवेळी ग्रे रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर दरोडेखोरांनी हा हल्ला केला.

दरोडेखोरांनी लोखंडी पाईप आणि काठ्यांनी कारवर हल्ला करत काचा फोडल्या.दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर काही अंतरावरील निर्जनस्थळी त्यांना सोडून देत कारमधील ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर फरार झाले.  शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिसांची विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us