
अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.
नितीन पवार यांनी सांगितले की, ‘गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना ऍडमिट केलेले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली आज आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणार्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आप्तस्वकियांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.
वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे… pic.twitter.com/7hPH7WCtEx— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी शरद पवार यांनी बाबा आढावांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, अशी सदिच्छा व्यक्त केली होती.
समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणाले की, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे.
सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते बाबा आढाव जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले. पुण्यातून निघालेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीने देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग उजळवला.या दुःखाच्या वेळी, मी त्यांच्या शोकाकुल कुटुंब आणि असंख्य सहकाऱ्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
सामाजिक न्याय के मजबूत स्तंभ और महान श्रमिक नेता बाबा आढाव जी के निधन का समाचार अत्यंत दुखद और एक अपूरणीय क्षति है।
वंचितों, शोषितों और मजदूरों के अधिकारों के लिए उन्होंने अपना संपूर्ण जीवन समर्पित कर दिया। पुणे से उठी उनकी संघर्ष की ज्योति ने देशभर में मशाल बन कर सामाजिक न्याय… pic.twitter.com/8c1pfPmQg5
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 8, 2025
असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. डॉ बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी होते. असंघटित कामगार, वंचित, कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले.
‘हमाल पंचायती’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व करत समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या निधनाने कष्टकरी समाजाचा मोठा आधारस्तंभ व मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आढाव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.