
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. सैफ अली खान याच्या वांद्रे (पश्चिम) घरी घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सैफच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. या जीवघेण्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या जामीन अर्जावर येत्या १७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. मोहम्मद शरीफुलला जामीन देण्यास मुंबई पोलिसांनी कडाडून विरोध केला आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी नागरिक असून तो अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास आहे. त्याने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला उत्तर देताना पोलिसांनी जोरदार विरोध केला आहे.
पोलिसांनी याबद्दल न्यायालयात उत्तर सादर करण्यात आलं आहे. ज्या चाकूने सैफ अली खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्या चाकूचे तीनही तुकडे फॉरेन्सिक तपासणीत जुळून आले आहे. हा आरोपीविरुद्ध महत्त्वाचा पुरावा आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, आरोपी हा बांगलादेशी असून तो भारतात अवैधपणे राहत आहे. जर त्याला जामीन दिला तर तो फरार होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला आहे. त्यामुळे शरीफुलच्या जामीन अर्जाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, आरोपी शरीफुलने आपल्या जामीन अर्जात असा दावा केला आहे की मला खोट्या प्रकरणात गोवण्यात येत आहे. तसेच, पोलिसांनी अटक करताना मला कोणतेही कारण न सांगितल्यामुळे माझ्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, असे आरोपीने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे. आता न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.