रात्री कुटुंबासोबत जेवण केलं, गाढ झोपेत असतानाच घोणसने दंश केला; 50 वर्षीय महिलेचा तडफडून मृत्यू, सांगलीत हळहळ

वंदना जाधव गाढ झोपेत असतानाच अत्यंत विषारी घोणस जातीच्या सापाने त्यांना दंश केला. दंश झाल्यानंतर तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना जाग आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न झाले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

रात्री कुटुंबासोबत जेवण केलं, गाढ झोपेत असतानाच घोणसने दंश केला; 50 वर्षीय महिलेचा तडफडून मृत्यू, सांगलीत हळहळ
अतिविषारी घोणस जातीचा साप
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 10:33 AM

Sangli: सांगली जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्री कुटुंबीयांसोबत जेवण करून झोपलेल्या 50 वर्षीय महिलेचा विषारी सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील तांबवे गावात ही घटना घडली. घरात गाढ झोपेत असताना घोणस जातीच्या विषारी सापाने महिलेचा चावा घेतला. मध्यरात्री अचानक जाग आल्यानंतर त्यांना सर्पदंश झाल्याचं लक्षात आलं. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

वंदना अनिल जाधव असं मृत महिलेचं नाव आहे. त्या तांबवे इथल्या प्रगतशील शेतकरी अनिल जाधव यांच्या पत्नी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, वंदना जाधव या कासेगाव रस्त्यावरील आपल्या शेतातील घरात कुटुंबासह राहत होत्या. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व सदस्यांनी एकत्रित जेवण केलं. त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले. रात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास अचानक एक दुर्दैवी घटना घडली.

Loading...

मध्यरात्री जाग आली अन् सर्पदंश झाल्याचं समजलं

वंदना जाधव गाढ झोपेत असताना घरात शिरलेल्या घोणस जातीच्या विषारी सापाने त्यांना दंश केला. अचानक झालेल्या तीव्र वेदनांमुळे त्यांना जाग आली. आपल्याला सापाने चावा घेतल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने शेजारी झोपलेल्या पती अनिल जाधव आणि मुलगी अमरजा यांना उठवलं. त्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली.

कराडला नेताना वाटेतच मृत्यू

वंदना यांना सर्पदंश झाल्याचं समजताच कुटुंबीयांनी वेळ न घालवता त्यांना पुढील उपचारासाठी कराड इथल्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, घोणस जातीच्या सापाचं विष अत्यंत घातक असल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. रात्री कुटुंबीयांसोबत आनंदाने जेवण करून झोपलेल्या वंदना जाधव यांचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वंदना जाधव यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे तांबवे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us