Jayant Patil : छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सांगतो, सरकार बदलल्यानंतर एक एक चुनके..जयंत पाटलांची जाहीर स्टजेवरुन वॉर्निंग
Jayant Patil : "लढाई करायचं म्हणलं की अवघड नाही, पण योग्य वेळी लढाई करायची,आपल्या हिशोबाने लढाई करायची,काही लोक धनशक्तीच्या जोरावर प्रचंड उडया मारू लागली आहेत"

“अकरा वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पण कधी मस्तीत माजलो नाही. कोणावर मस्ती देखील केली नाही. आम्ही कधीच शोबाजी करत नाही. दंगा ही करत नाही” अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना खोचक टोला लगावला. “टाईम बदलत असतो, न्याय बुद्धीने वागलात तर हा तालुका तुमचा सत्कार करेल” असं देखील आमदार जयंत पाटलांनी पोलिसांचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे गोपीचंद पडळकरांना इशारा दिला. “लढाई करायचं म्हणलं की अवघड नाही, पण योग्य वेळी लढाई करायची,आपल्या हिशोबाने लढाई करायची,काही लोक धनशक्तीच्या जोरावर प्रचंड उडया मारू लागली आहेत. सरकारी व्यवस्था सेवेला असल्यासारखं अर्विभावात वागायला लागली आहेत” असा टोला आमदार जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
सांगलीच्या बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पडळकरांकडून करण्यात आलेल्या टीकेवरून जयंत पाटलांनी हा टोला लगावला आहे.”छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सांगतो,सरकार बदलल्यानंतर एक एक चुनके..” अशा शब्दात आमदार जयंत पाटलांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. टाईम बदलत असतो हे स्पष्ट केलं.
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत रस्त्यावर उतरले
ऊस दराच्या मागणीसाठी सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत रस्त्यावर उतरले आहेत. ऊसाला प्रति टन 5000 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येत आहे.विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हातामध्ये उसाचे कांडे घेत आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर शेतकरी देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत.