Atul Kulkarni : एलॉन मस्क निवडणूक हरला, पैशाची ताकद…अमेरिकेतील निवडणूक निकालांवर अतुल कुलकर्णींचं वक्तव्य चर्चत
Atul Kulkarni Post : अतुल कुलकर्णी यांनी अमेरिका निवडणूक निकालावर पोस्ट शेअर केली असून त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षानं मिळवलेल्या मोठ्या यशामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, उद्योगपती एलॉन मस्क यांनी रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करूनही अपेक्षित यश मिळवता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
अतुल कुलकर्णी हे केवळ आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवरील स्पष्ट मतांसाठीही ओळखले जातात. अमेरिकेतील निवडणूक निकालांनंतर त्यांनी एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित राजकीय घडामोडींवर भाष्य करत पैशाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट जिंकता येत नाही, असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
अमेरिकेतील निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची सरशी
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षानं दमदार कामगिरी केली आहे. अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये रिपब्लिकन उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. टेक्सास, कॅन्सस, ओहायो, नॉर्थ कॅरोलिना आणि साउथ कॅरोलिना यांसारख्या राज्यांमधील निकालांनी राजकीय समीकरणं बदलली आहेत. विशेष म्हणजे, २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या काही भागांमध्ये यावेळी मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला पसंती दिली. त्यामुळे ट्रम्प यांच्या राजकीय धोरणांबाबत मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एलॉन मस्कसुद्धा काल निवडणुक हरला.
पैशाची ताकद हरू शकते. घनिष्ठ राजकीय संबंधांवर आधारित भांडवलशाही हरू शकते.
हंगेरी हे आणखी एक उदाहरण.
जगभरातील नेत्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
#GlobalPhenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) November 5, 2026
अतुल कुलकर्णी यांची पोस्ट
रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी एलॉन मस्क यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यांच्या आर्थिक पाठबळाचा निवडणुकीत अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने मिळवलेल्या यशामुळे मस्क यांनाही राजकीय पातळीवर मोठा धक्का बसला. यासंदर्भात अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘एलॉन मस्कसुद्धा काल निवडणुक हरला. पैशांची ताकद हरू शकते. घनिष्ठ राजकीय संबंधांवर आधारित भांडवलशाही हरू शकते. हंगेरी हे आणखी एक उदाहरण. जगभरातील नेत्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे.’ केवळ अफाट संपत्ती, राजकीय संबंध किंवा सत्तेचा प्रभाव यांच्या जोरावर जनमत आपल्या बाजूनं वळवता येत नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
