कोरोनाबाधित आईच्या बाळावर प्रेमाची सावली, शेजारी महिलेकडून चिमुकलीचा सांभाळ

| Updated on: Apr 26, 2021 | 11:38 AM

कोरोनाबाधित मातेने आपल्या शेजारी राहत असलेली मैत्रीण ऐश्वर्या वेल्हाळ यांना बाळाचा सांभाळ करण्याची विनंती केली. (Sangli Neighbor baby COVID)

कोरोनाबाधित आईच्या बाळावर प्रेमाची सावली, शेजारी महिलेकडून चिमुकलीचा सांभाळ
कोरोनाबाधित महिलेच्या बाळासह ऐश्वर्या वेल्हाळ
Follow us on

सांगली : कोरोनासारख्या जागतिक महामारीत माणुसकी लोप पावत आहे की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच सांगलीच्या कडेगावातील एका विवाहितेने त्याबाबतची शंकाही पुसून टाकली. ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ या आपल्या शेजारच्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाचा अकराव्या दिवसापासून सांभाळ करत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी नवजात बाळाला जणू आईचे प्रेम दिले. (Sangli Neighbor taking care of new born baby of COVID Positive Lady)

कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसुती

कडेगाव शहरांतील आझाद चौकात ऐश्वर्या वेल्हाळ आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका कुटुंबातील पाच जणांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये बाळाच्या मातेचाही समावेश आहे. गर्भवती महिला कोरोनाबाधित असतानाच तिला कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न झाले.

बाळंतीणीला बाळापासून दूर राहण्याचा सल्ला

आई कोरोनाबाधित, तर निरोगी बाळाची तब्येत काहीशी नाजूक होती. त्यामुळे नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. त्यानंतर बाळंतीणीला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळाच्या मातेने आपल्या शेजारी राहत असलेली मैत्रीण ऐश्वर्या वेल्हाळ यांना आपल्या बाळाचा सांभाळ करण्याची विनंती केली.

ऐश्वर्या यांनी कसलाही विचार न करता अकराव्या दिवसापासून बाळाचा सांभाळ करण्याचे मान्य केले. त्यांना पती अनिकेत आणि सासरे बाळासाहेब वेल्हाळ यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली. अशा रितीने ऐश्वर्या दहा दिवसांपासून बाळाचा सांभाळ करत आहेत.

स्वतःची मुलगी समजून सांभाळ

कोरोना काळात सर्वांनी माणुसकी जपली पाहिजे. ज्या घरातील लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत केली पाहिजे. त्याप्रमाणे मी माझ्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाची अकराव्या दिवसापासून माझी स्वतःची मुलगी समजून सांभाळ करत आहे, अशा भावना ऐश्वर्या यांनी व्यक्त केल्या.

त्या बाळाला दररोज न्हाऊ-खाऊ घालत आईची ऊब देतात. त्या बाळाला किरकोळ आरोग्याची तक्रार असली, तरी त्याला दवाखान्यात नेऊन औषधोपचार करतात. त्यांच्या मायेच्या व प्रेमाच्या सावलीत संबंधित बाळ आता चांगलेच बाळसेदार झाले आहे. संकटसमयी त्यांनी घालून दिलेला हा आदर्श सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

संबंधित बातम्या :

नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान

कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!

(Sangli Neighbor taking care of new born baby of COVID Positive Lady)