‘चिखलीचा गाझियाबाद केला’; गायकवाड, महाले वाद पेटला, आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यामधील वाद आता चांगलाच पेटला आहे. संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यामधील वाद आता चांगलाच पेटला आहे. श्वेता महाले यांच्याकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना काही आरोप करण्यात आले होते. आता या आरोपांना संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जर शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा महाले यांनी मला दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय कराचचं ते करेल. मात्र यात काही तथ्य नसेल आणि शिवसैनिक बहिणींना आणि बुलढाण्यातील महिलांना बदनाम करायचा प्रयत्न असेल , तर त्यांनी इतक्या निच पातळीपर्यंत गेले नाही पाहिजे , सगळे हिंदुत्त्ववादी चारित्र्यवान लोक असून, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न त्यांनी करू नये. असं यावेळी गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बुलढाण्याचं बिहार झालं आहे, असं श्वेता महाले यांनी म्हटलं होत. यावर देखील संजय गायकवाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. ज्यांनी तीन चार मर्डर केले, बलात्कार केले, लुटमार केली, ज्यांनी लोकांच्या पोरी उचलल्या, ज्यांनी संपत्ती हडप केली, रिव्हॉल्व्हर घेऊन फिरतात, त्यांना जेलमध्ये घातले, परंतु त्यांना तुमच्या पतीने सोडवायचं काम केलं असंही यावेळी गायकवाड यांनी म्हटलं आहे.
जे सहा महिने जेलमध्ये होते त्याच्यासोबत तुम्ही जेवण करता . गुंडांना ताकद देऊन तुम्ही बुलढाण्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधील गुंड आणले तरी माझ्या बुलढाण्याचे रक्षण करण्यासाठी मी सक्षम आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगतो की माझं वैयक्तिक भांडण नाहीये. मी फक्त माझा पक्ष वाढवण्यासाठी चिखलीत गेलो. लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी चिखलीत गेलो, असंही यावेळी संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
माझा बुलढाणा बिहार आहे का? त्याहीपेक्षा तुम्ही तुमच्या चिखलीला गाझियाबाद पेक्षाही भयानक करून ठेवलेले आहे . तुम्ही लोकांची प्रॉपर्टी हडप केली, प्रॉपर्टीवर आरक्षण तुम्ही टाकले , लोकांचे जीवन जगणे मुश्कील केले, असा घणाघातही आरोप यावेळी गायकवाड यांनी केला आहे.
