बांगलादेशी देशाला धोका आहे तर सर्वात आधी शेख हसीना यांना बाहेर काढा; संजय राऊत यांचं केंद्र सरकार आव्हान

संजय राऊत यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी हल्ल्यामागील संशयित बांगलादेशी असल्याचा दावा केला आहे, यावरून राऊत यांनी भाजप सरकारची जबाबदारी ठरवली आहे. बांगलादेशी स्थलांतराचा मुद्दा उपस्थित करून राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बांगलादेशी देशाला धोका आहे तर सर्वात आधी शेख हसीना यांना बाहेर काढा; संजय राऊत यांचं केंद्र सरकार आव्हान
संजय राऊत
| Updated on: Jan 20, 2025 | 11:38 AM

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो करणारे बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली, ते करणारे बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून बोला. चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंग्यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना बांगलादेशी म्हणून जो आश्रय दिलाय… त्यांना बाहेर काढताय का? सांगा मोदींना जाऊन. सर्व बांगलादेशींना देशातून बाहेर काढा. सर्वात आधी शेख हसीना यांना देशातून बाहेर काढा, असं आव्हानच संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिलं आहे.

किरीट सोमय्या बांगलादेशींकडे गेले होते. संतोष देशमुखचा खून कोणी केला हे जाऊन तिथे विचारा. संतोष सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे विचारा. परभणीतील पोलिस कोठडीत जाऊन विचारा. मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची आहे म्हणून बांगलादेशी… बांगलादेशी करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे, असा आरोप करतानाच बांगलादेशींविरोधातील मोहीम आम्ही सुरू केली होती. तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते? संसदेत आम्हाला कोणी बोलू दिलं नाही? तेव्हा भाजपचं सरकार होतं. त्यांनी आम्हाला संसदेत बोलू दिलं नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

पोलिसांचा दावा राजकीय

बांगलादेशी कनेक्शन हा पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे. मी स्पष्ट सांगतो. जर बांगलादेशी मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं सरकार सर्वस्वी जबाबदार आहेत. बांगलादेशी मुंबईत आले कसे? पोहोचले कसे? गेल्या 10 वर्षात याला कोण जबाबदार आहे? दिल्लीत बांगलादेशी आहेत, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत. मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफच्या घरात घुसून चाकू हल्ला करतो हा प्रकार रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवत आहात. त्याचं खापर दुसरं कुणावर फोडत असाल तर चुकीचं आहे. मला भाजपच्या लोकांना सांगायचं की हा भाजपचा डाव आहे, असं संजय राऊत म्हणाले.

तेव्हा सैफ लव्ह जिहादचं प्रतिक होता

मी अनेक वर्ष पत्रकारिता केली. क्राईम रिपोर्टर म्हणून माझी सुरुवात झाली आहे. मुंबईत आणि पोलीस खात्यात काय चालतंय हे मला साधारण कळतं. सैफ अली खानवर ज्या प्रकारचा हल्ला झाला त्यावर मी बोलणार नाही. त्याचा तपास सुरू आहे. पण त्याचं राजकारण कोणी करत असेल तर चुकीचं आहे. तपास भाजप करत नाही, पोलीस करत आहे. भाजपने त्यांची एसआयटी सुरू केली आहे का? कालपर्यंत सैफ अली खान तुमचं लव्ह जिहादचं प्रतिक होता. लव जिहाद… लव जिहाद करत होते. त्याच्या मुलाला त्याचं नाव माहीतही नाही, कुणाच्या पोटी जन्माला आलो तेही त्या तैमूरला माहीत नव्हतं. त्याच्यावर तुम्ही हल्ला करत होता. आज तुम्हाला पुळका आलाय? आंतरराष्ट्रीय कट? कसला आला आंतरराष्ट्रीय कट? या मुंबईत रोज 100 हल्ले होतात महिलांवर आणि पुरुषांवर. तुम्ही अपयशी आहात. तुमचं गृहमंत्रालय राज्याचं आणि देशाचं अपयशी आहे. रोहिंगे आले असतील आणि बांगलादेशी आले असतील तर अमित शाह यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.