हक्कभंगाच्या कनेक्शनमधून राहुल कुल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप? राजकीय चर्चांवर संजय राऊत यांनी स्पष्टच उत्तर दिलं…

| Updated on: Mar 13, 2023 | 11:18 AM

Sanjay Raut News | संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर लावलेले आरोप वैयक्तिक शत्रुत्वातून आहेत का, यावरून राजकीय चर्चा सुरु झाल्यात. यावरून राऊत यांनी स्पष्टच उत्तर दिलंय.

हक्कभंगाच्या कनेक्शनमधून राहुल कुल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप? राजकीय चर्चांवर संजय राऊत यांनी स्पष्टच उत्तर दिलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप का केलेत? राहुल कुल यांच्यावर राऊत यांनी वैयक्तिक रोषातून आरोप केलेत का? संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग समितीशी असलेल्या कनेक्शनमधूनच हे प्रकरण बाहेर आलंय का, अशा अनेक चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरु आहेत. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात मनी लाँडरींगच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात सुरु असलेल्या हक्कभंग कारवाई प्रक्रियेतील समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. मात्र राहुल यांच्यावरील आरोपांमागे कोणताही वैयक्तिक रोष नाही, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय.

हक्कभंग कनेक्शनवर काय म्हणाले?

संजय राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग समितीवर असल्याने राहुल कुल यांच्यावर आरोप करण्यात आलेत का, यावरून संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलंय. ते म्हणाले, मी कोणत्याही नोटिशीला घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला. भीती हा शब्द मला शिकवलेला नाही. बाळासाहेब ठाकरेंकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्भयपणा. आम्ही पाप केलं नाही. पक्षांतर केलं नाही. हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत, हे मला माहिती नाही. माझ्यासमोर आलेलं प्रकरण मी समोर आणलं. अशी अनेक प्रकरणं आहे. फक्त ती शिवसेना-राष्ट्रवादीशी संबंध नाही, म्हणून सोमय्यांनी ती बाजूला ठेवली, असा आरोप राऊत यांनी केलाय.

फडणवीसांकडेच तक्रार का?

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे २००० पानांचे पुरावे पाठवले आहेत. पण मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांकडे का पाठवले, याचं स्पष्टीकरणही राऊत यांनी दिलंय. ते म्हणाले, ‘ मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाही. ज्यांचं सरकार भ्रष्टाचारातून आलंय, त्यांना कशासाठी पाठवू. अजूनही फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून त्यांच्याकडे पाठवलं.

फडणवीस म्हणाले होते…

देवेंद्र फडणवीस यांच्या एका वाक्याची संजय राऊत यांनी आठवण करून दिली. देशातील
विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यावर फडणवीस म्हणाले होते, तुम्ही भ्रष्टाचार करू नका, मग कारवाई होणार नाही. . त्यांच्यासाठी हे एक प्रकरण आहे. देशात, राज्यात भ्रष्टाचार कोण करतंय, यासाठी हे प्रकरण समोर काढलंय. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्यां आणि त्यांच्या मुलाने लाखो-कोटी रुपये गोळा केले. पण हे गोळा केलेले पैसे राजभवनात गेलेच नाहीत. त्यासंदर्भात गुन्हा दाखल केला. सेशन कोर्टानं त्याला जामीन नाकारला. तो भूमिगत झाला. नंतर फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर या प्रकरणी त्याला क्लिनचिट द्यायला लावली. तुम्ही कोणत्या घोटाळ्याला पाठिशी घालता? तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.