अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीचं काय होणार? संजय राऊतांनी थेट भविष्यच सांगितलं, म्हणाले…

अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले असून संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा आता प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष राहिला नसून तो पूर्णपणे दिल्लीश्वरांच्या दावणीला बांधला गेल्याची टीका त्यांनी केली आहे.

अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीचं काय होणार? संजय राऊतांनी थेट भविष्यच सांगितलं, म्हणाले...
ajit pawar sanjay raut
| Updated on: Feb 02, 2026 | 11:31 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या भवितव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांचा पक्ष आता मराठमोळ्या अस्मितेचा राहिलेला नसून तो पूर्णपणे अमित शाहांच्या चरणी अर्पण झाला आहे, असे खळबळजनक विधान संजय राऊतांनी केले.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासह अध्यक्षपदावरही भाष्य केले. मूळ राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आणि मराठी माणसाचा चेहरा होता. मात्र, भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर या पक्षावर दरोडा टाकला. आता अजित दादांच्या पश्चात हा पक्ष पूर्णपणे दिल्लीच्या तालावर नाचत आहे. हा पक्ष आता गोयल, पटेल, पारेख आणि मोदी-शाह यांचा झाला आहे. जे आमदार-खासदार या गुलामीचा आनंद साजरा करत आहेत, त्यांनी स्वतःला मराठी म्हणवून घेऊ नये, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

स्वगृही परतण्यासाठी धडपडत होते

अजित पवार कधीही भाजपच्या अजेंड्यावर काम करणारे नेते नव्हते. सत्तेसाठी ते एकत्र आले असले तरी, त्यांनी आपल्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि फाईली शहाणपणाने क्लिअर केल्या होत्या. त्यानंतर ते पुन्हा मूळ प्रवाहाच्या विचाराशी ठाम राहून स्वगृही परतण्यासाठी धडपडत होते. यासंदर्भात आमच्याशी आणि शरद पवारांच्या गटाशीही चर्चा सुरू होत्या, ज्याची कल्पना देवेंद्र फडणवीसांनाही असावी, असा दावा संजय राऊतांनी केला.

फडणवीसांवर विश्वास नव्हता हेच स्पष्ट

देवेंद्र फडणवीसांचा पक्ष अखंड महाराष्ट्राच्या विरोधात असून तो मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने आहे. अजित पवारांसारखा अस्सल मराठी नेता अशा विचारधारेसोबत दीर्घकाळ काम करू शकणार नाही, हे सर्वांना माहीत होते. जर त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा फडणवीसांशी केली नसेल, तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नव्हता हेच स्पष्ट होते, असेही संजय राऊतांनी म्हटले.

आता १०० टक्के दिल्लीचा गुलाम

अजित पवारांच्या पश्चात पक्षाच्या भवितव्यावर बोलताना राऊत म्हणाले की, दादा असताना पक्ष अस्सल मराठमोळा होता. मात्र आता हा पक्ष प्रफुल्ल पटेल किंवा अमित शाहांच्या मर्जीने चालणारा पक्ष होईल. भाजपने प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षांना गिळंकृत करण्याचे धोरण अवलंबले असून राष्ट्रवादीचा हा गट आता १०० टक्के दिल्लीचा गुलाम झाला आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us