महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागलंय, संजय राऊत का संतापले?

आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागलंय, संजय राऊत का संतापले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2023 | 9:36 AM

मुंबई : महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) आता जनतेलाच घाबरू लागले आहे. राज्यात जणू मोगलाई अवतरल्यासारखी वाटतेय, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. विदर्भातील पाणीप्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांना मिळालेल्या वागणुकीमुळे संजय राऊत यांचा संताप झालाय. अकोला ते नागपूर असे दहा दिवस पदयात्रा करत नागपूरपर्यंत आलेले आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी फडणवीसांच्या घरी भेट देण्याची परवानगी नाकारली होती. आज नागपूरच्या हद्दीबाहेरच पोलिसांनी त्यांना रोखले. कारवाईसाठी पोलीस आले असताना नितीन देशमुख हे जमिनीवर झोपले. अशा अवस्थेत पोलिसांनी त्यांचे हात पाय धरले आणि त्यांना उचलून नेलं.

नागपूरच्या वेशीवर काय घडलं?

10 एप्रिल पासून अकोल्याहून निघालेले आमदार नितीन देशमुख आज नागपूरच्या वेशीवर पोहोचले. पोलिसांनी नागपूरच्या हद्दीवरच ही संघर्षयात्रा थांबवली. आमदार देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरच्या वेशीवर वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात होती. पोलिसांनी संघर्षयात्रेला पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची परवानगी आंदोलकांनी माहिती होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली. आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. अखेर पोलिसांनी नितीन देशमुख यांचे दोन हात आणि दोन पाय पकडून अक्षरशः उचलून नेलं.

संजय राऊत यांचं ट्विट..

आमदार नितीन देशमुख यांना दिलेल्या वागणुकीनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलंय..
पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या
आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले.
खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले!

नितीन देशमुख यांचा इशारा..

अकोला आणि अमरावती येथील जनतेला खारं पाणी प्यावं लागतं. ही समस्या घेऊन आम्ही फडणवीसांकडे निघालो होतो. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार, असा इशारा नितीन देशमुख यांनी दिलाय. तर पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन आंदोलनदेखील करू, असा इशारा
आंदोलकांनी दिलाय.