MIM नगरसेवक नव्हे तर या व्यक्तीने निदा खानला 35 दिवस लपवलं? शिरसाटांनी थेट नाव सांगितलं, म्हणाले तिला मुंब्र्याहून…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर 'अर्बन टेररिस्ट' म्हणत हल्लाबोल केला आहे. निदा खानला शहरात लपवण्यात जलील यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

MIM नगरसेवक नव्हे तर या व्यक्तीने निदा खानला 35 दिवस लपवलं? शिरसाटांनी थेट नाव सांगितलं, म्हणाले तिला मुंब्र्याहून...
Sanjay Shirsat nida khan
| Updated on: May 13, 2026 | 12:16 PM

नाशिकमधील प्रसिद्ध आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मोठी मोहिम हाती घेतली. एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर आणि दुकानावर आज प्रशासनाने हातोडा चालवला. या कारवाईनंतर राजकीय ठिणगी पडली असून राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली. इम्तियाज जलील हा खऱ्या अर्थाने अर्बन टेररिस्ट असून त्यानेच निदा खानला शहरात आणून लपवले होते, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

कायदेशीर कारवाईवर राजकारण करू नका

संजय शिरसाट यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मतीन पटेल यांचे घर आणि दुकान पूर्णपणे अनधिकृत होते. प्रशासनाने त्यांना आधीच नोटीस बजावली होती. त्याविरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते, मात्र तिथे दिलासा मिळाला नाही. कायद्यानुसारच ही जमीनदोस्त करण्याची कारवाई झाली आहे. मात्र, इम्तियाज जलील रात्री १२ वाजता तिथे जाऊन काळजी करू नका, पुन्हा घर बांधून देऊ असे आश्वासन देत आहेत. हे आरोपींचे उघड समर्थन आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

निदा खान प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जलील?

निदा खान प्रकरणावरून संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना थेट लक्ष्य केले. संपूर्ण महाराष्ट्राचे पोलीस ज्या निदा खानचा शोध घेत होते, तिला मुंब्र्याहून संभाजीनगरमध्ये आणणारा आणि मतीन पटेलच्या घरात ३५ दिवस लपवून ठेवणारा दुसरा तिसरा कोणी नसून इम्तियाज जलीलच आहे. जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावे की त्यांनी निदाला आणले नाही का? त्या बिचाऱ्या नगरसेवकाचा यात काहीच रोल नाही, त्याला जलील यांनीच यात ओढले आहे,” असा सर्वात मोठा दावा शिरसाट यांनी केला.

‘जलील यांचेही घर पाडणार’

संजय शिरसाट यांनी केवळ मतीन पटेलच नव्हे, तर खुद्द जलील यांच्या मालमत्तेच्या चौकशीचे आदेश देणार असल्याचे सांगितले. “मतीनप्रमाणेच इम्तियाज जलील यांचे घरही अनधिकृत आहे का, याची चौकशी मी लावणार आहे. नकाशा आणि परवानगीनुसार बांधकाम नसेल तर जलील यांचेही घर पाडले जाईल. केवळ विरोधकच नव्हे, तर माझ्या पक्षाचा नगरसेवक जरी असला आणि त्याचे बांधकाम अनधिकृत असेल, तरी आम्ही ते पाडणारच. अनधिकृत बांधकामाला सरकारचा कोणताही पाठिंबा नाही,” असा सज्जड दम संजय शिरसाट यांनी दिला.

या भागात लव्ह जिहाद आणि हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याचे कारस्थान रचले जात आहे. या सर्वांचा म्होरक्या इम्तियाज जलील आहे. ते शहरात विषाचे बी पेरत असून निजामाची मानसिकता जोपासत आहेत. जलील आम्हाला घटना आणि कायदा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते स्वतः मुख्य आरोपी आहेत. मतीन पटेलने दिलेल्या जबाबावरून जलील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकार म्हणून आम्ही पोलिसांच्या तपासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास केला जाईल,” असेही संजय शिरसाट यांनी ठणकावून सांगितले.

Follow Us