
Who Is Krishna Andhale : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांपेक्षा जास्त दवस उलटले आहेत. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचेही आरोप आहेत. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. आता नुकतंच आमदार सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे कोण? त्याची पार्श्वभूमी काय? यांसह इतर सर्व माहिती दिली.
संतोष देशमुख खूनाचा छडा लावण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे. सुरुवातीला हा तपास पोलीसच करत होते. पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. आता त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.
“कृष्णा आंधळे याच्याबद्दल मी माहिती घेतली. पोलिसांकडून ही माहिती घेतली. एसआयटी चांगलं काम करत आहे. आमच्या जिल्ह्यातील पोलीसही चांगलं काम करत आहेत. काही पोरांची नाव पेपरमध्ये आली आहेत. माझी वरिष्ठांना किंवा माहिती देणाऱ्या विनंती आहे की चुकीची माहिती देऊ नये. भागवत, शेलार यांच्यासारख्या एलसीबीच्या ज्या पोरांनी जी कोणी लोक आहेत यांनी ६ पैकी ५ आरोपी यांनीच पकडले आहेत आणि आता त्यांचीच नाव टीव्हीवर ‘आका’शी संबंध असल्याचे दाखवलं जात आहेत.” असे सुरेश धस म्हणाले.
“कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्या घरी गरीबी आहे. पत्र्याचं घर आहे. त्याला फारसं काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो असा त्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वैगरे अशा ठिकाणी गेला आहे का? याचा तपास सुरु आहे. तो सध्या फरार आहे. कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे, हा आरोपी आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी तो फरार आहे. ५० दिवस झाले आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे. पण आम्ही तपासावर समाधानी आहोत. उज्वल निकम साहेबांची ऑर्डर ही निघाली पाहिजे.” अशी संपूर्ण माहिती सुरेश धस यांनी दिली.