38 वर्षांपासून कोर्टात ससेहोलपट, आरोपी गेला तो आलाच नाही; पण वृद्ध पोलिसांचे प्रचंड हाल, साताऱ्याच्या खटल्याची देशात चर्चा
Satara 138 KG Ganja Case : 38 वर्षांपूर्वी म्हणजे 1988 च्या ऑगस्टमध्ये सातारा पोलिसांनी खंडाळा हद्दीत मोठी कारवाई करत तब्बल 138 किलो गांजा जप्त केला होता. अजूनही हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

संतोष नलावडे, प्रतिनिधी: साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 38 वर्षांपूर्वी म्हणजे 1988 च्या ऑगस्टमध्ये सातारा पोलिसांनी खंडाळा हद्दीत मोठी कारवाई करत तब्बल 138 किलो गांजा जप्त केला होता. आरोपीला अटक झाली, गुन्हा दाखल झाला आणि तपासही पूर्ण झाला. पण आश्चर्य म्हणजे, 38 वर्षे उलटूनही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. विशेष म्हणजे ज्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यातले काही अधिकारी आज वयाच्या 74 आणि 76 व्या वर्षीही न्यायालयात साक्षीसाठी हजर राहत आहेत. तर गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी जामिनानंतर पसार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
ऑगस्ट 1988 मध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखेने खंडाळा हद्दीत मोठी कारवाई करत 138 किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी एपी मोहम्मद अली, रा. पालेघाट, केरळ या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. साक्षीदार नारायण ठोंबरे, तत्कालीन सातारा LCB अधिकारी सुभाष शिंदे आणि पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. गुन्हा दाखल झाला, आरोपीला अटकही झाली.पण पुढे जामिनावर सुटलेला आरोपी पुन्हा न्यायालयात कधीच हजर झाला नाही आणि पाहता पाहता तब्बल 38 वर्षे निघून गेली.
निवृत्तिनंतरही पोलिसांचे कोर्टात हेलपाटे…
या प्रकरणातील तक्रारदार अधिकारी सुभाष शिंदे यांना त्यांच्या एका उल्लेखनीय कामगिरी बद्दल देशाच्या राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, निवृत्तीनंतरही या जुन्या प्रकरणासाठी त्यांना पुण्याहून साताऱ्यातील वाई न्यायालयात साक्ष देण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. या कारवाईतील दोन पोलीस कॉन्स्टेबल काळाच्या पडद्याआड गेले आहेत,
तर हयात असलेले इतर साक्षीदार आज वयाच्या 74 आणि 76 व्या वर्षी न्यायालयात उपस्थित राहत आहेत. कधीकाळी गुन्हेगारांच्या मागावर धावणारे हे शिपाई आणि अधिकारी आज न्यायाच्या प्रतीक्षेत कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत.
प्रामाणिक पोलिसांना न्याय कधी मिळणार?
एकीकडे वय वाढलं, अधिकारी निवृत्त झाले, काही सहकारी काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, 38 वर्षांपूर्वी दाखल झालेला हा खटला अजूनही कागदपत्रांमध्येच अडकला आहे. ज्यांनी कायद्याचं राज्य टिकवलं, ते आजही न्यायालयात हजर होत आहेत आणि ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे, ते मात्र मोकाट फिरत आहेत. म्हणूनच आज साताऱ्यात प्रश्न केवळ 138 किलो गांजाचा नाही. तर 38 वर्षांनंतरही या प्रामाणिक पोलिसांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.