
सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिल्ह्यातील फलटण येथे एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे, तीने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, या घटनेनं आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तीने पीसएआय गोपाळ बदाने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप केले आहे.
प्रशांत बनकर याने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला, तर गोपाळ बदाने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला असं या महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान हे प्रकरण समोर येताच गोपाळ बदाने याचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होतं, त्यानंतर बदाने हा फरार होता, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच तो पोलिसांना शरण आला, तर या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच अटक केलं होतं. या प्रकरणात गोपाल बदाने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे, पोलिसांकडून आरोपींच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे, यावेळी काही डिजिटल गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली आहे, मात्र आरोपींच्या घरात नेमकं काय सापडलं? हे अद्याप समोर आलेलं नाहीये. ज्या ठिकाणी ही आत्महत्येची घटना घडली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आल्याचं दोषी यांनी म्हटलं आहे. आरोपी आणि डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात होते. बनकर सोबत आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरचं बोलणं झालं होतं, असा खुलासा देखील या प्रकरणात पोलिसांनी केला आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याच्या बहिणीकडून मात्र मोठा दावा करण्यात आला आहे. महिला डॉक्टरने प्रशांत बनकर याला प्रपोज केलं होतं, असा दावा तिने केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.