
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिला डॉक्टराने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. डॉ. मुंडे या एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादामुळे चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.
या चौकशीदरम्यान तिने आपल्या वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. या तक्रारीत तिने माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन असे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र या गंभीर तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे बोललं जात आहे. अखेर सततचा मानसिक तणाव आणि प्रशासकीय अडचणींना कंटाळून महिला डॉक्टरने यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
या घटनेची नोंद फलटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कामाचा वाढता ताण, प्रशासकीय अडचणी, वरिष्ठांचा दबाव आणि अंतर्गत चौकशी यामुळे आरोग्य कर्मचारी अनेकदा गंभीर मानसिक तणावाखाली असतात.
सध्या वैद्यकीय संघटनांकडून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महिला डॉक्टरच्या निधनामुळे फलटण शहर आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे अशा अनेक केसेस आतापर्यंत आलेल्या आहेत. विशेषत: पुणे, ठाणे आणि मुंबईतील काम करणाऱ्या महिला पोलिसांनाही अशाच प्रकारे त्रास दिला जातो. जर अशा पद्धतीने विभागात काम करणाऱ्या महिलाही सुरक्षित राहत नसतील तर आम्ही ज्यांच्या हातात हे गृहखातं आहे त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या. याला त्यांनी उत्तर द्यायला हवं. तुम्ही आता कितीही चौकशी करा, एक जीव गेला. याची काळजी जर आधीच घेतली असती, तीन महिन्यांपासून तिला त्रास दिला जात होता. अजून धक्कादायक खुलासे पुढे येतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.