Satish Chavan: ‘अजितदादा असते तर घात करण्याची कुणाची हिंमत झाली असती का?’ महायुतीच्या उमेदवाराने सांगितला पराभवाचा टर्निंग पॉईंट, म्हणाले…
Satish Chavan News: आता सगळं मनात ठेवणार, वेगळे कार्यक्रम करणार, असं म्हणत पराभवानंतर सतीश चव्हाणांनी सूचक इशारा दिला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सतीश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाला आहे. पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल्याचे पाहायला मिळाले आहे. मराठवाड्यातील महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्याला दाखल होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले होते. तसेच मेळाव्याला आमदार विक्रम काळे यांचे उपस्थिती होती. यावेळी सतीश चव्हाण मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना सतीश चव्हाण म्हणाले की, काय बोलू कुठून सुरु करू हे समजत नाही. अनेक जणांना भेटायचं होतं, म्हणून हा कार्यक्रम घेतला. खरंतर पराभव झाला हे मला मान्य नाही. हा घात झाला. मी प्रत्येक वेळेस सांगतो प्रचाराचं तंत्र बदलत आहे. आपण केले त्यामुळे काहीतरी गडबड होऊ शकते. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. मी 18 वर्षे काम केले याची चूक वाटते. पंधरा दिवस काम करून त्यांना 80 हजार मतं मिळाली. त्याचा हिशोब आता आपण त्यावेळेस घेऊ.
ते म्हणाले की, काम करणाऱ्या माणसाच्या उणिवा राहतात. अठरा वर्षात काही कामं राहिली असतील परंतु मी काही चुकीचं काम केलं नाही. माझा कोणावरही राग नाही. जो पराभव झाला तो माझ्यामुळे झाला असं मी समजतो. कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो, तुम्ही मला अठरा वर्ष सांभाळलं. आज निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम दाखवलेला विश्वास मी आयुष्यभर विसरणार नाही. आपल्याला सगळ्या जिल्ह्यात मतं मिळाली, काही जणांना काही मतदारांना माझा प्रवास पटला नसेल.
सतीश चव्हाण यांनी सांगितलं की, काहींना वाटलं असेल सतीश भाऊंना संधी दिली. आता नवीन माणसाला संधी देऊन मात्र योग्य माणसाला संधी द्यायला पाहिजे होती. ही खंत माझ्या मनात आहे. या निवडणुकीत सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे अजितदादा नसणे. अजित दादा असते तर कुणाची हिम्मत होती का घात करण्याची. काल मी सुनेत्रा पवार यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला धीर दिला. सुनेत्रा ताईंनी सांगितलं सतीशराव तुमचं तर एक निवडणूक झाली माझी तर रोज निवडणूक आहे. दादा नाहीत मी कसं करत असेल.
ते म्हणाले की, मला कार्यक्रम करायची सवय नाही. मात्र आता प्रत्येकाचा कार्यक्रम करावा लागेल. मी वेडा नाही, आता सगळं मनात ठेवणार आणि वेगळा कार्यक्रम करणार. पराभवाचं दुःख नक्कीच आहे. मात्र तुमचे प्रेम गमवण्याची भीती मला कधीच वाटली नाही. फक्त आम्ही 400 लोकांना बोललो होतो. मात्र एवढे मोठे लोक जमलेत. पद असो नसो माझी दरवाजे आणि माझं मन तुमच्यासाठी कायम उघडं राहील. तुमचं वैयक्तिक काम असो सार्वजनिक काम असो मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहील.
सतीश चव्हाण पुढे म्हणाले की, निवडणुकीला अजून खूप वेळ आहे काय काय होईल. अजितदादांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की, पराभवाने खचून जायचं नाहीं विजयाने मातून जायचं नाही. तो रील वाला रील करून 20000 मतं घेतो. आता मी सुद्धा रील बनवणार आहे. एक लाख मते घेणार आहे, अशं म्हणत त्यांनी अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले की, जय पराजय होत असतो. पराभवाने खचायचे नाही विजयाने मातायचे नाही ही अजितदादांची आम्हाला शिकवण आहे. ही पहिली निवडणूक आहे आज अजितदादा नाहीत. प्रतापसिंह पाटलांचं मी अभिनंदन करतो. रविराज साबळे यांनी लढत दिली त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो. तरुणाने राजकारणात आलं पाहिजे. देश पातळीवर आंदोलनाचा सुद्धा या निवडणुकीवर परिणाम झाला. दादा असते तर विश्वास तोडायची कोणाचीच हिम्मत झाली नसती. मराठवाड्यात अनेकदा बदल झाले आहेत.
महायुतीबाबत बोलताना सतीश चव्हाण म्हणाले की, मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही. त्याबद्दल महायुतीचे नेते निर्णय घेतील. महायुतीच्या नेत्यांनी काही वक्तव्य केले असतील तर त्याचा अभ्यास करून त्यांच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल. महायुतीच्या नेत्यांनी त्याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सत्तार यांनी उघड विरोध केला. मला त्यांचं काही वाटत नाही. मात्र ज्यांनी गुपचूप बरोबर राहून विरोध केला त्यांची सुद्धा दखल घ्यावी लागेल.
ते म्हणाले की, महायुती म्हणून बंब यांनी मदत केली मी कुठे नाही म्हणतो. आता इंस्टाग्राम आलं आहे. आंदोलनामुळे थोडा परिणाम झाला आहे. युवक मला सांगत होते तुम्ही MPSC च्या आंदोलनात का गेले नाही. गांभीर्यपूर्वक सांगतो महसूल प्रशासनाच्या सुद्धा चुका झाल्या. नवीन यादी जेव्हा अपडेट केली तेव्हा अनेक लोकांची नाव मतदान यादीत आले नाहीत.