Shivsena News: ‘मुंबईहून सुरतकडे निघालेली पहिली गाडी माझी…’ गुवाहाटी रिटर्न नेत्याने A टू Z स्टोरी सांगितली!
"नितीन देशमुख हा माणूस राम नाम सत्य होण्यासारखा नाही. नितीन देशमुख पण ताकतवान आहे. साहेब एवढेच म्हणाले तू गुवाहाटीपर्यंत चल, मी तुला तेथून विमान देऊ शकतो. शिरसाट साहेबांच्या विधानात काय तथ्य नाही, असे म्हणत त्यांच्या विधानाला कैलास पाटील यांनीही फार महत्त्व देऊ नये, असा सल्लाही शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे.

रवींद्र देसाई, प्रतिनिधी: एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली, त्यावेळी सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचे राम नाम सत्य होणार होते, असा सर्वात मोठा खळबळजनक दावा शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील तसेच नितीन देशमुख यांनी आम्हालाच संपवण्याचा कट होता, असा गंभीर आरोप केला. यावरुनच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, गुवाहाटीच्या बंडात सर्वात गाजलेले काय झाडी, काय डोंगर फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
“या बंडावेळी राम नाम सत्य सारखी कोणतीही परिस्थिती मला तिथे दिसून आली नाही. वेगवेगळ्या टप्यात वेगवेगळी लोक तिकडे गेले. मी पहिल्या टप्प्यात होतो. स्पष्ट सांगायचं म्हटलं तर मुंबई सोडून सुरतकडे निघालेली पहिली गाडी माझी होती. पाठीमाग येणाऱ्यांचं काय घडलं मला माहित नाही. राम नाम सत्य असं कोणतंही नव्हतं, मुळात तिकडे जाताना सगळ्यात निराश कोण होतं तर शिंदे साहेब होते. आमदाराच्या दबावापोटी हा निर्णय घ्यावा लागला अन्यथा आमदारांचा गट रागाच्या भरातच दुसऱ्या पक्षात गेला असता, ” असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी सांगितला.
“प्रवासाला लागल्यानंतर आणि गावाकडे कळल्यानंतर माघारी फिरावे अशी अवस्था काही मित्रांची होती. ज्यांनी परत फिरण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना शिंदे साहेबांनी तातडीने तू तुझ्या घराकडे जा असे म्हणत परवानगी दिली. उलट नितीन देशमुख यांना स्पेशल विमान करून नागपूरला पाठवले. त्यांनी त्यांच्या घरच्यांना फोन केला नितीन आनंदीत आहे व्यवस्थित आहे, मी त्याला पाठवून देतो असे सांगितले. शिंदे साहेबांचा आग्रह माझ्याकडे या असा कोणालाही नव्हता,” असंही शहाजी बापू पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, “नितीन देशमुख हा माणूस राम नाम सत्य होण्यासारखा नाही. नितीन देशमुख पण ताकतवान आहे. साहेब एवढेच म्हणाले तू गुवाहाटीपर्यंत चल, मी तुला तेथून विमान देऊ शकतो. शिरसाट साहेबांच्या विधानात काय तथ्य नाही, असे म्हणत त्यांच्या विधानाला कैलास पाटील यांनीही फार महत्त्व देऊ नये. एखाद्या शब्दावरून लांबवत बसणं हे राज्याच्या हिताचं नाही. ह्या दोघांच्या हिताचे नाही जनतेच्या हिताच नाही, मुळात दुष्काळावर दोघांनी बोलावे,” असा सल्लाही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे.