MPSC च्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा, रोहित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात मोर्चा धडकणार, नेमक्या काय मागण्या असणार?

MPSC च्या अध्यक्षपदावरून विवेक भिमनवार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी रोहित पवारांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

MPSC च्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा, रोहित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात मोर्चा धडकणार, नेमक्या काय मागण्या असणार?
rohit pawar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 12:31 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी दुसऱ्यांदा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे. त्यानंतर रोहित पवारांनी एमपीएससीच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात 26 सप्टेंबर रोजी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांच्याकडून आंदोलन केलं जाणार आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी ही मागणी या आंदोलनात प्रामुख्याने असणार आहे. एमपीएससीने तत्काळ सर्व रिक्तपदांवर भरती करून घेण्यात यावी ही मागणी आंदोलनात असणार आहे. मागच्या वेळी रोहित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्र्‍यांनी भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.

 

भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाणे २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ताकद द्यावी.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us