उद्धव ठाकरेंना दिवसभरात दोन मोठे धक्के, राजन साळवींनंतर विदर्भातील बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

शिंदे साहेब जेव्हा आम्हाला सोडून गेले, तेव्हापासून पक्षात फक्त गटबाजी उरली होती आणि साटलोटचे राजकारण उरलं होतं. महाविकासआघाडीमध्ये देवाण घेवाण करुन तिकीट वाटप केल्या गेले. कोणताही सर्व्हे न करतात तिकिट वाटप करण्यात आले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंना दिवसभरात दोन मोठे धक्के, राजन साळवींनंतर विदर्भातील बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत
shisena thackeray group
| Updated on: Feb 13, 2025 | 9:20 PM

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता राजन साळवींनंतर विदर्भातील एका बड्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात दोन मोठ्या नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आज ठाकरेंना दुसरा धक्का दिला आहे. राजन साळवी यांच्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. मुकेश जीवतोडे यांच्यासोबतच विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

मुकेश जीवतोडे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 50 हजार मते मिळाली होती.  यानंतर मुकेश जीवतोडे यांनी जोरदार भाषण केले. शिवसेना कार्यकर्त्यांची जाणीव फक्त शिंदे साहेबांनाच आहे. त्यामुळे आज मी प्रवेश केलेला आहे, असे मुकेश जीवतोडे म्हणाले.

तेव्हाच एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची भावना कार्यकर्त्यांची होती

“गेल्या कित्येक वर्ष एकनाथ शिंदे जेव्हा नगरविकास मंत्री होते, तेव्हापासून मी जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होतो. मात्र शिंदे साहेब जेव्हा आम्हाला सोडून गेले, तेव्हापासून पक्षात फक्त गटबाजी उरली होती आणि साटलोटचे राजकारण उरलं होतं. महाविकासआघाडीमध्ये देवाण घेवाण करुन तिकीट वाटप केल्या गेले. कोणताही सर्व्हे न करतात तिकिट वाटप करण्यात आले. मविआच्या उमेदवाराचे डिपॉजिट देखील जप्त झालं. मी निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार ठरलो आणि मला 50 हजार मते मिळाली. तेव्हा साहेबांसोबत जाण्याची भावना कार्यकर्त्यांची होती”, असेही मुकेश जीवतोडेंनी सांगितले.

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बळ मिळालं नाही

“शिवसेना कार्यकर्त्यांची जाणीव फक्त शिंदे साहेबांनाच आहे. त्यामुळे आज मी प्रवेश केलेला आहे. आमच्या चंद्रपूरमध्ये एकही आमदार नसला तरी 2029 ला सहापैकी 3 आमदार आमचे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. उद्धव ठाकरेंनी चंद्रपूर मध्ये कधी फेरी मारली नाही आणि ज्यावेळेस सत्ता होती. तेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी यांना जे बळ मिळायला हवं होतं, त्या पद्धतीने कधी बळ मिळाले नाही”, अशी खंतही मुकेश जीवतोडेंनी व्यक्त केली.