शिवसेनेच्या खासदाराची गाडी अडवून पुन्हा गद्दारीचा शिक्का मारला; कार्यकर्त्यांनी केली एकमेकांना बघून घेण्याची भाषा

| Updated on: Mar 08, 2023 | 9:23 PM

शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राहुल सावंत यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला.

शिवसेनेच्या खासदाराची गाडी अडवून पुन्हा गद्दारीचा शिक्का मारला; कार्यकर्त्यांनी केली एकमेकांना बघून घेण्याची भाषा
Follow us on

कोल्हापूरः एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार करण्यास भाग पाडले हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरूनही पायउतार व्हावे लागल्यामुळे राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही गटातील वाद टोकाला जाऊन एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यातच शिंदे गटाच्या आणि आताच्या शिवसेनेच्या आमदारांवर आणि नेत्यांवर ठाकरे गटाकडून गद्दारीचा शिक्का मारण्यात येऊ लागला.

त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला होता. आता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चंदूर या गावी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने गेले असता त्यांची गाडी अडवण्यावरून तालुक्यातील वातावरण तंग बनले होते.

खासदार धैर्यशील माने आज हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यावरही गद्दारीचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले होते.

यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तु्म्ही गद्दारी का केली असा सवालही त्यांनी यावेळी केला. खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर धैर्यशील गटातील आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटावर जोरदार प्रतिहल्ला केला.

यावेळी ठाकरे आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देत एकेमकांना बघून घेण्याची भाषा केली होती.

ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आल्या नंतर हा वाद चिघळण्याची चिन्ह दिसताच पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळीही धैर्यशील माने यांच्याविरोधात गद्दारीचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आली.

यावेळी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राहुल सावंत यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला. त्यानंतर तर तुम्ही काळ आणि वेळ सांगा कोण कोणाला भारी पडतं पाहू असा प्रतिहल्ला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राहुल सावंत यांनी केला.