कृषी, शिक्षण खाते मंत्र्यांना शिक्षा वाटते, राज्यातील नेत्यांना मलाईदार खाती हवीत, संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यातील नेत्यांना चांगली खाती नको, त्यांना मालईदार खाती हवी आहेत. त्यामुळे शिक्षण, कृषीसारखी चांगली खाती घेण्यास कोणी तयार होत नाही.

कृषी, शिक्षण खाते मंत्र्यांना शिक्षा वाटते, राज्यातील नेत्यांना मलाईदार खाती हवीत, संजय राऊत यांचा घणाघात
संजय राऊत
| Updated on: Jun 01, 2025 | 10:33 AM

शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. महायुती सरकारमध्ये शिक्षण, कृषी यासारखी चांगली खाती कोणालाही नको आहे. मलाईदार खात्यांकडे सर्वांचे लक्ष आहे. नगरविकाससारखी खाती नेत्यांना हवी आहेत. देश कृषीप्रधान आहे. परंतु मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नाही. शिक्षण खाते, कृषी खाते मंत्र्यांना शिक्षा वाटत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊ नका. त्यांनी महाराष्ट्रातही मोदी फॉर्म्युला आणला आहे. त्यांनी पीए आणि पीएससाठी चाचणी घेतली. परंतु हे पीएस अन् पीए सर्वाधिक भ्रष्टाचारी आहेत. धुळ्यात शासकीय विश्रामगृहात मिळालेल्या रक्कम प्रकरणात अनिल गोटे यांनी हे उघड केले आहे. एकनाथ शिंदे यांचा सर्वांनी कचरा केला. परवा सर्वोच्च न्यायालयात तीन हजार कोटींचे लाच प्रकरण समोर आले. कचऱ्यापासून ते चिखलापर्यंत सर्वांचे पैसे खात आहे. त्यातून हे सरकार निर्माण झाले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

फडणवीस, शिंदे यांच्यावर टीका

मागे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे. या दोन्ही नेत्यांचे सरकार आल्यापासून लोकांच्या मनातील कायद्याची भीती संपली आहे. राज्यामध्ये अमानुषपणा वाढलेला आहे. सरकार देखील अमानुष आणि क्रूर आहे. लोकांना पैसे देऊन आपण कायदा मोडू शकतो, असे वाटू लागले आहे, असे पुणे येथील वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाचा संदर्भ घेत राऊत यांनी सांगितले.

ही तर अंधश्रद्धा

गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरात जाण्याचा अनुभव संजय राऊत यांनी सांगितला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोक जायला लागले. अनेकांच्या हातात, कोंबड्या बकरे असतात? हा काय प्रकार आहे, हे पाहून मला धक्का बसला. प्राण्यांचे बळी देऊन, त्याच मुंडके कापून पूजा केली जाते, हा विचित्र प्रकार आहे. आपण संत गाडगे महाराज यांच्या राज्यात राहतो, असे प्रकार कसे चालणार? त्या ठिकाणी याबाबत मी पुजाऱ्यांना विचारले, ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी शिवसेनेची लोक आली होती. त्यावेळी सर्वाधिक बळी चढवले गेले. आम्हाला चांगली दक्षिणाही मिळाली. इच्छा पुरती करण्यासाठी प्राण्यांचे बळी दिले जातात. परंतु प्राण्यांचे बळी देणे ही अंधश्रद्धा आहे, असे राऊत यांनी म्हटले.