मोठी बातमी! एका आमदाराची उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी, मोठं कारण आलं समोर
UBT MLAs Meeting : आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एक आमदार गैरहजर असल्याचे समोर आले आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाबेह ठाकरे पक्षाला मोठे धक्के बसले असून 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतर सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या. या सभांना चांगली गर्दीही झाली होती. खासदारांनंतर आमदारही फुटणार असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एक आमदार गैरहजर असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला एक आमदार गैरहजर
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. घरी कार्यक्रम असल्यामुळे राहुल पाटील मुंबईतील बैठकीला गेले नाहीत. याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असल्याचे राहुल पाटील यांनी म्हटले आहे. राहुल पाटील गैरहजर असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते, मात्र आता राहुल पाटील यांनी घरगुती कारणामुळे बैठकीला जाता आले नसल्याची माहिती दिली आहे.
24 आमदार बैठकीला हजर
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला विधानसभेचे 19 तर विधानपरिषदेचे 5 आमदार हजर होते. मात्र राहुल पाटील हे एकमेव आमदार या बैठकीला गैरहजर आहेत. या आधीच्या बैठकीलाही राहुल पाटील यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. त्यावेळी राहुल पाटील यांनी वारीच्या कार्यक्रमानिमित्त गैरहजर असल्याचे कारण दिले होते. आता पावसाळी अधिवेशनादरम्यान असलेल्या बैठकीलाही पाटील यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
आमदार फुटीच्या चर्चांदरम्यान बैठकीला खास महत्त्व
समोर आलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमदारांना मार्गदर्शन केले. आमदार फुटीची चर्चा सुरू असल्यामुळे या बैठकीला खास महत्त्व आलेले होते. काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही समोर आलेले असाताना उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला खास महत्त्व प्राप्त झालेले असताना आता एका आमदाराने मात्र या बैठकीला दांडी मारली आहे.