सुषमा अंधारे Vs संजय शिरसाट, कोल्ड वॉर सुरूच, व्रत करणाऱ्या महिलांची खिल्ली उडवणारा Video पोस्ट

| Updated on: Apr 04, 2023 | 8:42 AM

सुषमा अंधारे विरुद्ध संजय शिरसाट यांच्यातील कोल्ड वॉर सुरुच आहे. काल अंधारेंनी शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर आज शिरसाट यांनी अंधारेंचा जुना व्हिडिओ शेअर केलाय.

सुषमा अंधारे Vs संजय शिरसाट, कोल्ड वॉर सुरूच, व्रत करणाऱ्या महिलांची खिल्ली उडवणारा Video पोस्ट
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे (Sambhajinagar) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विरुद्ध शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामधील कोल्ड वॉर सुरूच आहे. शिवसेनेत येताच विविध मंदिरांमध्ये पूजा-आरतीला उपस्थित राहणाऱ्या सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी देवीभक्त महिलांची कशी खिल्ली उडवली होती, नवरात्रीत उपवास करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे काय विचार होते, हे दर्शवणारा व्हिडिओ संजय शिरसाट यांनी शेअर केलाय. आधी हिंदु देवी-देवतांची टिंगल आणि आता चक्क देवीची आरती करणाऱ्या सुषमा अंधारे यांची दुटप्पी भूमिका दर्शवणारे दोन व्हिडिओ संजय शिरसाट यांनी इन्स्टाग्रामवरून शेअर केलेत. सुषमा अंधारे यांचे हे व्हिडिओ आता नव्याने शेअर केले जात आहेत. कालच सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला.

अंधारेंच्या ‘त्या’व्हिडिओत काय?

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचा काही वर्षांपूर्वीचा आणि काही महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ शेअर केलाय. या दोन्ही व्हिडिओमध्ये प्रचंड विरोधाभास आहे. आधीच्या व्हिडिओत अंधारे यांनी नवरात्रीत उपवास करणाऱ्या, पायात चप्पल न घालणाऱ्या, गादीवर न बसणाऱ्या महिलांची खिल्ली उडवल्याचे दिसते. तर दुसऱ्या व्हिडिओत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची भूमिका कशी बदलली आहे हे दिसते. देवीच्या मंदिरात आरती करतानाचा दुसरा व्हिडिओ आहे.

शिरसाट यांच्याविरोधात मानहानीचा दावा

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुषमा अंधारे तसेच महिला आयोग आक्रमक झाला आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या या वक्तव्याविरोधात तीन शहरांमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र परळी, संभाजीनगर आणि पुणे या तिन्ही शहरात शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. अखेरीस काल अंधारे यांनी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात शिरसाट यांच्याविरोधात ३ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. महिला आयोगानेही पोलिसांकडून शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याच्या ध्वनिचित्रफिती मागवल्या आहेत.

शिरसाट वक्तव्यावर ठाम

दरम्यान, आमदार संजय शिरसाटदेखील त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केल्यानंतर मीसुद्धा बोलू शकतो. मलाही माहिती आहे. ज्या वक्तव्याबद्दल आक्षेप घेतला जातोय, ते वाक्त मी आमच्या आमदारांना उद्देशून म्हटलो होतो. मी एकही अश्लील शब्द वापरला नाही, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेतून दिलंय.