काही तरी सेटिंग राहून गेली असेल… निवडणुकीचा निकाल पुढे जाताच निलेश राणे यांचा खोचक टोला

Nilesh Rane : आज झालेल्या मतदानाचा निकाल उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर पडला आहे. यावरून आमदार निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे.

काही तरी सेटिंग राहून गेली असेल... निवडणुकीचा निकाल पुढे जाताच निलेश राणे यांचा खोचक टोला
Nilesh Rane
Image Credit source: Google
| Updated on: Dec 02, 2025 | 8:09 PM

आज राज्यातील 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. आज झालेल्या मतदानाचा निकाल उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सर्व निवडणुकांचे निकाल 21 तारखेला जाहीर होणार आहेत. यावर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाष्य केले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

निलेश राणेंचा खोचक टोला

आमदार निलेश राणे यांना निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, मी तुम्हाला आधीच म्हटलं की काहीतरी सेटिंग राहुन गेली असेल. त्यासाठी अजून काही दिवस लागणार असतील म्हणून असं झालं असेल. निवडणुकीच्या मधोमध प्रचाराचा एक दिवस वाढवला. मी आता पर्यंत 4 निवडणुका लढवल्या, यात मी एकही निवडणूक पाहिली नाही ज्यात एक दिवस आधी 10 वाजेपर्यंत प्रचार सुरु असतो आणि दुसऱ्या दिवशी मतदान झाले. लोकांना सगळं लक्षात आलं आहे. कुठतरी सेटिंग राहिली आहे करायची, कुठेतरी तार जोडत असतील.

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात धाड टाकून पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी आतमध्ये भाजपचा झेंडा असलेली आणि बिना नंबरप्लेट असलेली गाडी पकडली होती. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, कोकण आयजींपासून माझ्यावर लक्ष होते. पोलीस काय करत आहेत ते दिसत आहे. आरोपी सुटले आहेत, गाड्या पण काही वेळात सुटतील. बिना नंबरची गाडी सुटली आहे. मी वकीलांशी बोलून पुढचा निर्णय घेईल.

21 डिसेंबरला निकाल

दरम्यान, आता 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होणार आहे, त्यानंतर निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर करता येतील, तर आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.