नगरसेवक रमेश म्हात्रेंचा पाय आणखी खोलात; रुग्णालयातून थेट न्यायालयात हजर करणार, काँग्रेस नगरसेविकेनेही केली मोठी मागणी
Dombivli hospital row : डोंबिवली डॉक्टर प्रकरणात आज शुक्रवारी रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या म्हात्रेंना डिस्चार्ज मिळालाय. त्यांना कल्याण न्यायालयाने बुधवारी फिटनेस सर्टिफिकेट मागितलं होतं. त्यानंतर त्यांना आज शुक्रवारी डिस्चार्ज मिळालाय. त्यानंतर रमेश म्हात्रेंना आज शुक्रवारी अडीच वाजता कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे. याचदरम्यान नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या हिंसक वागणुकीवरून काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. रमेश म्हात्रेंसारख्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायला लाज वाटते, अशी भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
रमेश म्हात्रे यांना बुधवारी अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाल्याने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. रमेश म्हात्रे न्यायालयात हजर होईपर्यंत पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीचा आदेश देणार नसल्याचे न्यायालयाने पोलिसांना सांगितले होते. मारहाण प्रकरणातील इतर तीन आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज शुक्रवारी संपत आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या चौघांची पोलीस कोठडी वाढवली जाणार की न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार, तसेच तपासासाठी आणखी कोणती माहिती आणि पुरावे आवश्यक आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
रमेश म्हात्रेंना निलंबित करा, नगरसेविका कांचन कुलकर्णी यांची मागणी
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या हिंसक वागणुकीवरून काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या माणसाने महिला डॉक्टरवर हात उचलला आहे. त्या माणासाची प्रतिमाच ही ठिकठिकाणी मारामारी करण्याची आहे. या लोकांसोबत सभागृहात बसायला भीती वाटत आहे’.
‘सत्ताधारी उपमुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजना चालवत आहेत. त्याच सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी महिलांना मारहाण करत आहेत. हीच का लाडक्या बहिणींची परतफेड आहे का? असा सवाल त्यांनी केला. ‘एखाद्या गरीब माणसाला अटक केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं का.. मला या नगरसेवकासोबत महासभेत बसायची देखील भीती वाटत आहे. महिलांना मारहाण करणारे आमच्या सभागृहात आहेत. मी मागणी करते की, या नगरसेवकाला बडतर्फ केले पाहिजे. त्याचं निलंबन केलं पाहिजे. असे व्यक्ती लोकप्रतिनिधीच्या पात्रतेचे नाहीत, असेही त्यांनी पुढे म्हटले.