
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली. कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला आहे. आत याच प्रकरणावरुन ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून कबुतरखाना बंदी प्रकरणी भाष्य करण्यात आले आहे. सध्याच्या कबुतरखाना बंदीच्या प्रकरणामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. “सध्या समाजात माणसे मरोत, कुत्री-कबुतरे जगोत अशी एक नवीन विकृती निर्माण झाली आहे. रस्ते आणि रेल्वे अपघातांमध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. पण त्याची चिंता ना सरकारला आहे ना प्राणीदयावाद्यांना. भगवान महावीरांच्या विचारात हिंसेला, अशा बेभानपणाला स्थान नाही आणि चावणाऱ्या कुत्र्यांनाही सरकारचे पाच किलो धान्य द्या, असे हिंदू धर्मात सांगितले नाही. तरीही आपल्या देशात धर्माच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार सुरूच आहे”, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
भारत देशात भूक, असंख्य आजार, कर्जबाजारीपणा यामुळे माणसे मरत आहेत किंवा आत्महत्या करत आहेत, पण काही लोकांना या मरणाऱ्या बांधवांची चिंता नाही. त्यांना भूतदयेची उबळ येते व कबुतरे, भटकी कुत्री, मांजरी यांच्या जगण्याची, खाण्याची चिंता अस्वस्थ करते. कबुतरे आणि भटकी कुत्री यावरून मुंबई, दिल्लीत काही लोकांनी रान उठवले आहे. मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये दाणे टाकू नयेत असे आधी उच्च न्यायालयाने व आता सर्वोच्च न्यायालयानेही बजावले तरी भूतदयावादी ऐकायला तयार नाहीत. त्याच वेळी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना कोणीही भूतदया दाखवू नये. या कुत्र्यांना मानवी वस्त्यांपासून लांब शेल्टर होममध्ये नेऊन टाका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भारतातील सर्वच शहरांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री अंगावर धावून जातात, चावतात. अनेकदा लचके तोडतात. लहान मुलांवर भयंकर हल्ला करतात. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी तर अशा कुत्र्यांची दहशत घेतली आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत दोन कोटींवर लोकांना कुत्रा चावला. त्यात हजारावर लोक मरण पावले. काहींना कायमचे अपंगत्व आले. हे चित्र चांगले नाही, अशा शब्दात सामनातून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही भाष्य करण्यात आले आहे.
मुंबईत सध्या कबुतरे विरुद्ध माणसांचा हा असाच संघर्ष सुरू आहे. शूर महाराष्ट्राला आपले प्राण वाचवण्यासाठी कबुतरांशी लढावे लागत आहे आणि एक समाज त्या कबुतरांच्या बाजूने नुसता उभा नाही, तर प्रसंगी कबुतरांना दाणे घालण्यासाठी हाती शस्त्र घेऊन संघर्ष करू वगैरे भाषा त्या समाजाचे धर्मगुरू वापरत आहेत. कबुतरांना दाणे घालण्यावरून मीरा-भाईंदर, मुंबईत दंगली झाल्या. कबुतरे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत व त्यांना दाणे टाकू नयेत, कबुतरखाने बंद करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला तो काय त्याचे डोके ठिकाणावर नाही म्हणून? असा सवालही सामना अग्रलेखातून करण्यात आला
कबुतरांना दाणे टाकल्याने भूतदयेचे पुण्य प्राप्त होते, अशी भूमिका जैन धर्मीयांनी घेतली. यात खरोखरच धर्म आणि श्रद्धेची भावना किती? दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले. कुत्रा आणि हिंदू धर्मातील अनेक पंथांचे नाते आहेच. म्हणून ‘‘कुत्र्यांना पकडाल तर हाती शस्त्र घेऊ’’ वगैरे भाषा येथील नवहिंदुत्ववाद्यांनी केल्याचे दिसत नाही. श्री दत्तगुरूंच्या पायांशी श्वान म्हणजे कुत्रा आहेच, पण शिवाचा अवतार असलेल्या काळभैरवाचे वाहनसुद्धा कुत्रा आहे. काळभैरवाच्या या वाहनाविषयी हिंदू धर्मात मान्यता आहे. काळभैरवाच्या पूजेत काळ्या कुत्र्यास विशेष महत्त्व आहे. कुत्रा हाच काळभैरवाचा घोडा आहे असे सांगतात. तसे कोठे कबुतरांविषयी सांगितले आहे काय? असा टोलाही सामनाने लगावला आहे.
माणसांना चांगले जीवन जगता येत नाही. माणूस भुकेकंगाल, निकम्मा बनला आहे. मोदींच्या पाच-दहा किलो फुकट रेशनपाण्यावर भिकाऱ्यासारखा जगतोय. रस्त्यावर आणि रेल्वे अपघातांत हजारो लोक वर्षाला कुत्र्या-मांजरांसारखे चिरडून मारले जातात त्याचे दुःख ना सरकारला ना या भूतदयावाद्यांना. ‘माणसे मरोत, कुत्री-कबुतरे जगोत’ हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेली विकृती आहे. कबुतरांच्या खाण्यासाठी एक समाज हाती शस्त्र घेण्याची भाषा करतो. भगवान महावीरांच्या विचारात हिंसेला, अशा बेभानपणाला स्थान नाही आणि चावणाऱ्या कुत्र्यांनाही सरकारचे पाच किलो धान्य द्या, असे हिंदू धर्मात सांगितले नाही. तरीही आपल्या देशात धर्माच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार सुरूच आहे, असे सामनात म्हटले आहे.