
सोलापुरातील प्रख्यात न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात मनीषा मुसळे-माने या आरोपी आहेत. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मानेवर गुन्हा दाखल आहे. मनीषा माने हिला आत्तापर्यंत एकूण 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर आज पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती कोर्टाला केलीय. न्यूरो फिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं.
सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून शोनल वळसंगकर यांची देखील चौकशी केली होती. त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येला नेमके कोण जबाबदार आहे? हा प्रश्न निर्माण होतोय.
मनिषा मानेला पाहून प्रचंड संताप
आत्महत्येला मनीषा माने ही महिला जबाबदार असल्याचा आरोप आहे. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस 24 एप्रिल रोजी तिला वळसंगकरांच्या रुग्णालयात घेऊन गेले होते. तिला रुग्णालयात नेताच अजब प्रकार पाहायला मिळाला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मनिषा मानेला पाहून प्रचंड संताप व्यक्त केला.
मनिषा यांनी धमकी दिली होती…
ई-मेल लिहीत मनिषा यांनी स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती अशी माहीती उघड झाली आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्स बद्दलदेखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केले होते अशीही माहिती उघड झाली आहे.
डॉ. वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे, असा उल्लेख केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे आरोपी मनीषा मानेविरोधात हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा रोष आहे.