Laxman Hake: आरक्षणावरून हुज्जत, लक्ष्मण हाके यांच्या अंगावर तरुण धावले, सोलापूरमध्ये घडलं काय?

Laxman Hake Solapur Pakani Phata: प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि काही मराठा तरुणांमध्ये हुज्जत घडली. हे तरूण अंगावर धावून आल्याचा आरोप हाके यांनी केला. सोलापूर जिल्ह्यातील पाकणी फाट्यावरील हॉटेलमध्ये घडलं काय?

Laxman Hake: आरक्षणावरून हुज्जत, लक्ष्मण हाके यांच्या अंगावर तरुण धावले, सोलापूरमध्ये घडलं काय?
लक्ष्मण हाके, मनोज जरांगे पाटील
| Updated on: Sep 12, 2026 | 9:15 AM

मराठा आरक्षणाला विरोध करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि काही मराठा तरुणांमध्ये हुज्जत घडली. हे तरूण माझ्या अंगावर धावून आल्याचा आरोप हाके यांनी केला. उत्तर सोलापूर जिल्ह्यातील पाकणी फाटा येथील निसर्ग हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हाके हे या ठिकाणी जेवणासाठी थांबले होते. अगोदर तरुणांसोबत वाद झाला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असा आरोप हाके यांनी केला.

तीन तरूण ताब्यात

ओबीसी नेते लक्ष्मण हाके सोलापूर जिल्ह्यातील पाकणी फाटा परिसरातील हॉटेल निसर्ग येथे जेवायला थांबले होते. त्यावेळी लातूर जिल्ह्यातील काही मराठा तरूणांनी आपल्याशी हुज्जत घातली आणि ते अंगावर धावून आले असा आरोप हाके यांनी केला. हॉटेल परिसरात मोठा राडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतले. आपल्याला पाहताच या तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे हाके यांचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्याशी झटापट केल्याचा आरोपही हाके यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांचा मोठा आरोप

कालची घटना अत्यंत निंदनीय आहे. ओबीसी नेत्याला मारण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. आमच्या विरोधात कोणी बोलू नये, अशी दादागिरी आणि मस्तीखोर भाषा योग्य नाही. एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे गंभीर बाब आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचे काम सरकारने तातडीने थांबवले पाहिजे. ओबीसी नेत्यांना मोठ्या प्रमाणात धमक्या मिळत आहेत. जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यानंतर धमक्या दिल्या जातात, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सरकारने ओबीसी नेत्यांना आवश्यक ती सुरक्षा दिली पाहिजे. मलाही अनेकदा धमक्या आणि शिवीगाळ केली जाते, असे ते म्हणाले.

जरांगेंना सरकारने मोठे केले

अवैध धंदे करणाऱ्या काही लोकांना केवळ धमक्या देण्यासाठीच ठेवण्यात आले आहे का, असा प्रश्न पडतो. प्रत्येक वेळी आम्ही काय तक्रार करत बसायचे? मात्र, आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. सरकारनेच मनोज जरांगे पाटील यांना मोठे केले आहे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, आम्हीही आमची भूमिका स्पष्ट करू. जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक मराठा नेतेही बोलत आहेत. याचा अर्थ त्यांचे आंदोलन मराठा समाजाच्या हिताचे नाही, असे म्हणता येईल. काल एका मराठा नेत्यानेही जरांगे पाटील हे खाऊन आंदोलन करत असल्याचे म्हटले, असा आरोपही त्यांनी केला. तर गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगावे की, नेमक्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत अशी मागणी त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us