काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटलांविरोधात सरपंचांचं बेमुदत उपोषण

| Updated on: Feb 08, 2023 | 10:41 PM

शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सीईओना याबाबत निवेदन दिले होते. सांगोला तालुक्यातील शेकापच्या 45 सरपंचांनी आपला विरोध दर्शविला आहे.

काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटलांविरोधात सरपंचांचं बेमुदत उपोषण
Follow us on

सोलापूर : सोलापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून बेमुदत उपोषण केलं आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात हे उपोषण करण्यात येत आहे. शेकाप पक्षाची ज्या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आहे त्या ग्रामपंचातींची विकास कामे राजकीय दबावापोटी प्रलंबित करण्यात येत असल्याचं आरोप करण्यात आला आहे. या उपोषणामध्ये जवळपास शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सांगोल्याहून सोलापुरमध्ये दाखल झाले आहेत. याआधी शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सीईओना याबाबत निवेदन दिले होते.

निवेदन देऊन पंधरा दिवस लोटले तरी कोणतीच कारवाई न झाल्याने आजपासून बेमुदत उपोषण करत आहोत. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. जलजीवन मिशन मधील कामात भ्रष्टाचार केला जातोय. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.

सांगोला तालुक्यातील शेकापच्या 45 सरपंचांनी आपला विरोध दर्शविला आहे. सांगोला तालुक्यात शेकापच्या ग्रामपंचायतीमधील दलित विकास निधीबाबत अनियमितता प्रशासनाकडून झाली आहे. हा निधी गेल्या अडीच वर्षांमध्ये कशा पद्धतीने दिला आणि येणाऱ्या दीड वर्षात कशा पद्धतीने निधी देणार आहात याबाबत आम्ही प्रशासनाला जाब विचारला आहे.

मतदार संघातील अनेक कामे झालीच नाहीत मात्र त्याची बिले उचलली गेलीत. त्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आमचे आमदार शहाजी बापूंना आमचे आव्हान आहे त्यांनी याबाबत खुलासा करावा. संबंधित निधी वाटपातील अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न केल्यास जिल्हा परिषदेला टाळ ठोकणार असल्याचा इशारा शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख आणि बाबा करांडे उपस्थित आहेत.