
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला आहे. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यात या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली आहे, काँग्रेसचे 30 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी 10 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे मात्र महायुतीला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे, राज्यात महायुतीचे तब्बल 214 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपचे 120 उमेदवार विजयी झाले.
दरम्यान आता नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागताच महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, मोठी बातमी समोर येत असून, काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीसोबत युती करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. काँग्रेसने यापूर्वीच मुंबईमध्ये महापालिकेच्या सर्व 227 जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे, मात्र समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी देखील काँग्रेसकडून सुरू आहे. मुंबईत अनुसुचित जाती प्रवर्गातील 49 जागा आहेत, त्यामुळे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गट देखील या युतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता असून, आपल्या कोट्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटानं दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र काँँग्रेसने आधीच स्पष्ट केलं आहे, मनसे आणि एमआयएमसोबत युती करणार नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेसाठी आता काँग्रेसची शिवसेना ठाकरे गटाला वगळून वंचित बहुजन आघाडीसोबत युती होण्याची शक्यता आहे.