एसटी बस चालकांचा प्रवासी टाळून उड्डाणपुलांवरुन प्रवास, राज्य परिवहन महामंडळाचे कारवाईचे आदेश

राज्य परिवहन बसेस प्रवाशांना टाळून शॉर्टकट मारण्याच्या नादात उड्डाणपुलावरुन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे थांब्यांवर वाट पाहात असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या संदर्भात आता महामंडळाने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

एसटी बस चालकांचा प्रवासी टाळून उड्डाणपुलांवरुन प्रवास, राज्य परिवहन महामंडळाचे कारवाईचे आदेश
msrtc- st bus news
| Updated on: Nov 28, 2026 | 1:17 PM

राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसेस प्रवासी थांब्यांना टाळून उड्डाण पुलांवरुन नेल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व्हीस रोडच्या शेजारी उभे राहणाऱ्या प्रवाशांना या बसेसमध्ये बसता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रवाशांना टाळून थेट उड्डाणपुलांवरुन एसटी बसेसची वाहतूक केली जात असल्याने अशा चालकांवर आणि वाहकांवर कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाने अशा बेकायदेशीर वागणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात एसटी महामंडळाने आता एका परिपत्रकाद्वारे जाहीरपणे भूमिका घेतली आहे. विशेषत: नवी मुंबईत असे प्रकार वारंवार घडत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसेस मार्गावर धावत असताना बहुतांश बसेस या सर्व्हिस रोडचा वापर न करता सरार्सपणे उडाणपुलावरुन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भातील प्रवाशांच्या तक्रारी महामंडळा कार्यालयास वारंवार येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ अधिकाऱ्यांनी आप- आपल्या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक यांना सुचित करुन सर्व चालक आणि वाहक यांना सूचित करण्यास सांगितले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना उड्डाणपुलावरुन घेवुन न जाता त्या सर्व्हिस रोडवरील बस धांब्यावरुन नेण्यात याव्यात. जेणे करु प्रवाशांना या बसेसमध्ये चढ-उतार करणे शक्य होईल. या संदर्भात लेखी सूचना सर्व आगारांना लिहून त्याचे पालन करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) यांनी दिले आहे.

Loading...

वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार

भाडेतत्वावरील बसेसवरील खाजगी चालकांना देखील या संदर्भात विभागीय स्तरावर आपल्याकडून सुचना देण्यात याव्यात आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश सर्व आगारप्रमुखांना देण्यात आले आहेत. याबाबत विभागामध्ये तात्काळ विशेष मोहिम राबविण्यात यावी असेही या आदेशात म्हटले आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या संबंधित चालक आणि वाहकांवर कठोर कारवाई करण्यात याव असेही महामंडळाने म्हटले आहे. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी सातत्याने मार्गतपासणी पथकामार्फत तपासणी करण्यात यावी. कोणत्याही प्रवाशाला याची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही या आदेशात म्हटले आहे. यापुढे प्रवाशांच्या अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार प्रमुख यांना जवाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असेही एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक)म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us